जिल्ह्यात 7 मे रोजी मतदान तर 4 जून रोजी मतमोजणी.
======================================
======================================
सांगली दि. 16 (जि.मा.का.) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम आज दि. 16 मार्च 2024 रोजी जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात दि. 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण देशात 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहील. आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा माहिती अधिकारी फारूख बागवान, महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, निवडणूक कार्यक्रमानुसार 44-सांगली लोकसभा मतदारसंघासाठीचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. (१) अधिसूचना प्रसिध्दी - शुक्रवार दि. 12 एप्रिल 2024, (२) नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख - शुक्रवार दि. 19 एप्रिल 2024, (३) नामनिर्देशन पत्राची छाननी - शनिवार दि. 20 एप्रिल 2024, (४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख - सोमवार दि. 22 एप्रिल 2024, (५) मतदानाची तारीख - मंगळवार दि. 7 मे 2024, (६) मतमोजणीची तारीख - मंगळवार दि. 4 जून 2024, (७) निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख - गुरूवार दि. 6 जून 2024.
44-सांगली लोकसभा मतदार संघात 281-मिरज, 282-सांगली, 285-पलूस-कडेगाव, 286-खानापूर, 287-तासागाव-कवठेमहांकाळ व 288-जत या विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून जिल्ह्यातील 283-इस्लामपूर व 284-शिराळा मतदारसंघाचा समावेश 48-हातकणंगले या लोकसभा मतदार संघात आहे. सांगली जिल्ह्यात एकूण 24 लाख 22 हजार 200 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 36 हजार 308, स्त्री मतदार 11 लाख 85 हजार 776, तृतीयपंथी 116 मतदार आहेत. यामध्ये दिव्यांग मतदार 20 हजार 587, तर 85 वर्षावरील 39 हजार 323 इतके मतदार असून सैनिक मतदार 7 हजार 839 इतके असल्याचे सांगण्यात आले.
सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 2421 मतदान केंद्रे आहेत तर 27 सहाय्यकारी मतदान केंद्रे प्रस्तावित आहेत. शिराळा तालुक्यात 03 शॅडो मतदान केंद्रे असून या ठिकाणी संपर्कासाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी पुर्ण करण्यात आली आहे. मतदान ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बाबत मतदारांमध्ये जागृती व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाव्दारे महिला, नवमतदार आणि दिव्यांग मतदारांवर भर देवून जनजागृती करण्यात येत आहे. प्रचार व प्रसिध्दी यासाठी स्वीप मार्फत जनजागृती करण्यात येत आहे. Voter Portal, Voter Helpline App या ऑनलाईन पध्दतीचा वापर करून मतदार स्वत: नोंदणी करू शकतात.
निवडणूक प्रक्रियेची आणि आदर्श आचारसंहितेची सविस्तर माहिती राजकीय पक्ष तसेच अधिकाऱ्यांनी घ्यावी. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यादृष्टीने सर्वांनी दक्षता घेवून निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातींचे जिल्हास्तरावर गठीत केलेल्या माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती कडून प्रमाणिकरण करून घेणे बंधनकारक आहे. उलंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, पक्ष व त्रयस्त यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
सांगली जिल्ह्यासाठी मुक्त व पारदर्शी निवडणुका पार पाडण्याकरीता आवश्यक असणारे मनुष्यबळ व पुरेसा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. सांगली जिल्हा प्रशासन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सज्ज असून निवडणुकीबाबत विविध विषयासाठी जिल्ह्यामध्ये एकूण 20 नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांनी त्यांचे कामकाज सुरू केलेले आहे. जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहितेचे सर्वांनीच काटेकोरपणे पालन करून निवडणूक मुक्त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्याची आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत मतदारांना 1950 हा टोल फ्री क्रमांकावर तसेच सीव्हिजील ॲपवरून आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करता येणार आहे. त्यावर 100 मिनीटांच्या आत तक्रारीचे निराकरण होईल.
आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हास्तरावर पुरेशा प्रमाणात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक च्या schedule प्रमाणे काम करतील. या सर्व माध्यमातून निवडणूक मुक्त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.
आचारसंहिता लागू झाल्यापासून 24 तासाच्या कालावधीमध्ये शासकीय कार्यालये व आवारातील तसेच 48 तासात सार्वजनिक ठिकाणे व आवारातील लिखाण, अनाधिकृत राजकिय जाहिराती विविध प्रकारचे पोस्टर्स, कटआऊटस, बॅनर्स, झेंडे इत्यादी त्वरीत काढून टाकावयाचे आहेत. तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टँण्ड, विमानतळ, रेल्वे पूल, रस्ते, शासकीय बसेस, इलेक्ट्रीकल व टेलीफोन पोल यांच्यावरीलही सर्व जाहिराती काढून टाकावयाच्या आहेत. तर 72 तासाच्या कालावधीत खाजगी संपत्तीवरील सर्व अनाधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. आजपासून भरारी पथक, एसएसटी, व्ही.व्ही.टी., व्ही.एस.टी. कार्यान्वीत करण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या निवडणुकीसाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी केले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆