दिल्ली दि.31 : जनता पक्ष ‘अब की बार 400 पार’ असा नारा देते. पण मी मुंबईत म्हणालो त्याप्रमाणे ‘अब की बार, भाजपा तडीपार’ म्हणत हुकुमशाहीचा अंत करा, असे आवाहन दिल्ली येथील रामलीला मैदानात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या महारॅलीमध्ये केले. यानंतर मैदानात उपस्थित लाखो लोकांनी ‘अब की बार, भाजपा तडीपार’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या.
आम्ही सर्व इथे निवडणुकीच्या प्रचारासाठी नाही, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र आलो आहोत. कल्पना सोरेन आणि सुनिता केजरीवाल या हिंमतीने लढत असून त्यांच्यामागे संपूर्ण देश उभा आहे. आपल्या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू असल्याचा संशय होता, मात्र हा संशय खरा ठरला आहे. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक करून लोकांना भीती दाखवता येईल असे भाजपाला वाटत होते, पण त्यांनी देशवासियांना ओळखलेले नाही. देशातील नागरिक घाबरणारा नाही, तर लढणारा आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सोबत घेतले आहे. भाजपाच्या वाशिंग मशीनमध्ये स्वच्छ करून त्यांना आपल्या मंचावर बसवले आहे. भ्रष्ट लोकांना आपल्यासोबत घेऊन भाजपा देशाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकतो का? भ्रष्ट लोकं देशाचा विकास करू शकतात का? असा खडा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपाने आता आपल्या बॅनवर ईडी, सीबीआय, आयकर विभाग हे आमचे सहकारी आहेत असे लिहावे, असा टोलाही लगावला. एक व्यक्ती आणि पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक झाले असून देश मजबूत करण्यासाठी, देश वाचवण्यासाठी सर्व राज्य, प्रांत आणि जाती-धर्माचा सन्मान करणारे सरकार सत्तेत आले पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
भाजपाने इंडिया आघाडीच्या सभेला ठगांचा मेळावा म्हटले. इथे बसलेले लाखो देशप्रेमी ठग आहेत का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना रोखण्यात आले. त्यांच्या मार्गात खिळे ठोकण्यात आले, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाठीचार्ज करण्यात आला. अन्नदाता देवो भव: ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखायलाच हवे. ते ‘अब की बार 400 पार’ म्हणतात, पण हुकुमशाहीविरोधात ‘अब की बार भाजपा तडीपार’ हा नारा घुमायला हवा, अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆