=====================================
=====================================
भिलवडी : वार्ताहर दि. १७ मार्च २०२४
माळवाडी ता.पलूस येथील स्वप्नील सुधाकर मोरे यांची नाशिक विभागात कृषी सहाय्यकपदी निवड झाली. जानेवारी महिन्यात ही परीक्षा झाली होती. यामध्ये स्वप्नीलने घवघवीत यश संपादन केले. निकाल जाहीर होताच माळवाडी मुख्य चौकात मित्रपरिवाराने फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. घरीही जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
येथील क्षितिज अभ्यासिकेत तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याचा त्याला फायदा झाला. भिलवडी शिक्षण संस्थेत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. राहुरी कृषी विद्यापीठाचे
यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय कराड येथे त्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत बीएस्सी अँग्री ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी जोमाने स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली. ती करत असताना त्यामध्ये सातत्य ठेवले. सोशल मीडियाचा वापर कमी केला. नियमितपणे केलेल्या अभ्यासाचे हे फळ आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर अगदी पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्ण झाल्याचे वडील माळवाडीचे माजी उपसरपंच सुधाकर मोरे यांनी सांगितले. स्वप्नीलने सांगितले की, येथून पुढेही स्पर्धा परीक्षेची तयारी चालू ठेवणार आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते. चंदीगडचे दीपक वाधवा, छ.संभाजीनगरचे शुभम सर अकॅडमीचे सर्व प्राध्यापक यांच्यासह माळवाडी येथील क्षितिज अभ्यासिकेचे विक्रीकर निरीक्षक संतोष चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. क्षितिज अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची आजवर विविध क्षेत्रात निवडी झाल्या आहेत. या यशात आई-वडीलांची साथ त्यांचं पाठबळ व प्रेरणा लाभली. परिसरातून स्वप्नीलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆