yuva MAharashtra वासुंबेमध्ये सायकल रॅली, रांगोळी स्पर्धेचे आयोजन

वासुंबेमध्ये सायकल रॅली, रांगोळी स्पर्धेचे आयोजन




         सांगली दि.29 (जि.मा.का.) : येत्या सात मे रोजी लोकशाहीचा उत्सव पार पडत आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी स्वीप मोहिमेअंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नाचे फलित म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढावी असा आहे. तासगाव तालुक्यातील मौजे वासुंबे येथे गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये कमी मतदान झाले होते ही बाब तेथील नागरिकांना अस्वस्थ करत होती. यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला त्या अनुषंगाने स्वीप उपक्रमांतर्गंत मतदान वाढीसाठी तेथील प्रशालेची मदत घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्याद्वारे वासुंबे गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी व सायकल रॅली काढण्यात आली. 


त्याचबरोबर विद्यार्थी व पालक यांच्यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कामी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी उपस्थित नागरिकांना मतदान कर्तव्य बजाविण्याबाबत आवाहन केले. या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत, यंदा मतदानाचा हक्क मोठ्या प्रमाणावर बजावणार असल्याचे सांगितले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆