yuva MAharashtra एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू


             www.thejanshaktinews.in




 

         सांगली  दि. 26 (जि.मा.का.) : सांगली  जिल्ह्यात  दि. 27 एप्रिल 2024 रोजी ऑनलाईन पध्दतीने एमएचटी - सीईटी परीक्षा-2024 तीन परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे.

            परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार  किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे.

            एमएचटी - सीईटी परीक्षा-2024 जिल्ह्यातील आदर्श इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी खंबाळे (भा.) एमआयडीसी खानापूर-विटा ता. खानापूर, आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी, आष्टा ता. वाळवा, नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ, पेठ नाका ता. वाळवा या महाविद्यालयाच्या ठिकाणी  दि. 27 एप्रिल 2024 रोजी प्रथम सत्र सकाळी 7.30 ते दुपारी 12 व  व्दितीय सत्र दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 या वेळेत होणार आहे.

            हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖