सांगली दि. 13 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक २०२४ मधील निवडणूक कालावधीत गुगल पे, युपीआय, फोन पे, वॉलेट या सारख्या ऑनलाईन माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. यासाठी या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संशयित आर्थिक व्यवहारांवर लक्ष द्यावे, असे निर्देश ४४-सांगली लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज खर्च निरीक्षक संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ४४- सांगली लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकसाठी नियुक्त केलेल्या विविध पथकातील नोडल अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, मुख्य लेखा परीक्षक तथा जिल्हा खर्च सनियंत्रण समिती नोडल अधिकारी शिरीष धनवे आदी उपस्थित होते.
खर्च निरीक्षक संजीव कुमार म्हणाले, सद्या सर्वत्र ऑनलाईनद्वारे आर्थिक व्यवहार उपलब्ध माध्यमातून केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीतही या माध्यमातून आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या संशयित आर्थिक व्यवहारांवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. निवडणूक कालावधीत राज्य उत्पादन शुल्क, जीएसटी, पोलीस, इन्कम टॅक्स आणि बँक अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆