yuva MAharashtra 44-सांगली लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

44-सांगली लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


  उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन




 

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : 44-सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 4 जून 2024 रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे. मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय  प्रत्येकी 14 टेबलवर होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी उमेदवार व त्यांच्या नियुक्त प्रतिनिधींनी निवडणूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.



            उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनीचे यांच्यासह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथील स्ट्रॉगरुममध्ये ईव्हिएम कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवल्या आहेत.  4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून सकाळी  7 वाजता उमेदवार वा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष स्ट्रॉगरुम उघडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. यासाठी नियुक्त प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे.

मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरास अनुमती नसल्याने मतमोजणी प्रतिनिधी वा अन्य कोणीही मोबाईल,  स्मार्ट वॉच सोबत ठेवू नये. मतमोजणी केंद्रावर नियुक्त प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या प्रतिनिधींची माहिती प्रशासनास विहित वेळेत द्यावी. प्रतिनिधींची नावे कळविताना विधानसभा मतदारसंघनिहाय व टेबल क्रमांकानुसार नावे कळवावित. त्यानुसारच त्यांना त्या पद्धतीने ओळखपत्र वितरित केली जातील. प्रतिनिधींनी ओळखपत्र शिवाय ओळखीचा आणखी एक पुरावा म्हणून आधार कार्डही सोबत ठेवावे. ओळखपत्राचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रतिनिधींना त्यांना नेमून दिलेला टेबल सोडून इतर कोठेही फिरता येणार नाही.


            44 लोकसभा सांगली मतदार संघातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. यामध्ये 281- मिरज विधानसभा मतदारसंघातील 309 मतदान केंद्रावरील मतमोजणी 22 फेरीत, 282-सांगली विधानसभा मतदारसंघातील 308 मतदान केंद्रावरील मतमोजणी 22 फेरीत, 285-पलूस कडेगाव मतदार संघातील 285 मतदान केंद्रावरील मतमोजणी 20 फेरीत, 286-खानापूर विधानसभा मतदारसंघातील 348 मतदान केंद्रावरील मतमोजणी 25 फेरीत, 287-तासगाव-कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील 299 मतदान केंद्रावरील मतमोजणी 21 फेरीत आणि 288-जत विधानसभा मतदारसंघातील 281 मतदान केंद्रावरील मतमोजणी 20 फेरीत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖