yuva MAharashtra लोक जीवनपद्धतीचे तरंग आणि जीवनाकडे पाहण्याची लोकांची दृष्टीची सृष्टी "प्रेम उठाव" संग्रहातील कवितेतून वाचताना जाणवते

लोक जीवनपद्धतीचे तरंग आणि जीवनाकडे पाहण्याची लोकांची दृष्टीची सृष्टी "प्रेम उठाव" संग्रहातील कवितेतून वाचताना जाणवते





लोक जीवनपद्धतीचे तरंग आणि जीवनाकडे पाहण्याची लोकांची  दृष्टीची सृष्टी  "प्रेम उठाव" संग्रहातील कवितेतून वाचताना जाणवते



( पुस्तक परीक्षण लेख -: डॉ.कुलदीप वि . कदम विश्रामबाग सांगली ) 

तासगाव तालुक्यातील सपाट भाग आणि  खानापूर तालुक्यातील डोंगराळ भाग यांच्या मध्यभागी  वसलेले  फक्त 2000 लोकसंख्येचे गाव म्हणजचे  आमचे मूळ गाव गौरगाव होय. गौरगावच्या पूर्वेकडून उत्तरेला सरकत असलेल्या डोंगरदऱ्या गावच्या पश्चिमेला उभा पहारा देणारी खंडोबाची खडी आणि भवानी टेकडी आणि त्याच्या बाजूलाच  उभी असणारी जिल्हा परिषद शाळा,गौरगाव. म्हणजेच आमची लहानपणाची शाळा! 

मी आणि नवनाथ रणखांबे दोघे ही बालपणापासूनचे वर्गमित्र..... 
इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यत जि .प. शाळा  गौरगाव. ता - तासगाव, जि - सांगली. येथेच   सण 1991 ते 1997 पर्यत  आम्ही बालपणी एकत्र मिळून शिक्षण  घेतले.  
 खूप गरीब कुटुंबातून जन्माला आलेला नवनाथ पण शाळा आणि शिक्षणाची  खूप त्याला  आवड  होती. शांत प्रामाणिक आणि भोळ्या स्वाभावाचे नवनाथचे वडील कै. आनंदा  रणखांबे मला अजून आठवतात. अतिशय प्रमाणिक पण कडक आणि खंबीर स्वभावाची नवनाथची आई डोळ्या पुढे उभी राहते.     शाळेचा  आवार, हत्ती ओढा ---- ओढ्याचा खळखळ वाहणारा पूर, गावतळे -  आणि गावतळ्या पासून थोड्या दूरवर माळावर  नवनाथचे घर,  जसेच्या तसे अजून मला आठवते. आम्ही मळ्यात राहत असल्यामुळे दुपारच्या सुट्टी मध्ये नवनाथच्या घरी जेवायला जायचो.  त्याचे  मातीचे घर  ..... घराच्या अवतीभोवती वेडा घातलेली झाडे होती. पक्ष्यांचा किलबिलाट ...... त्याच्या दारात शेळ्या आणि एखादी म्हैस  असायची.  आजूबाजूला झेंडूची झुडपे  तर खाली खेळणारी रंगीबेरंगी  कोंबड्यांची पिल्ले चिवचिव करत असायची. त्याचे माळावर घर असल्याने  आजूबाजूला दूरवर कांही मोजकीच घरे होती. या सर्व जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा रेंगाळून तरंगू लागल्या होत्या,  कारण नवनाथचे दुसरे पुस्तक 'प्रेम उठाव'  माझ्या हातात पडले .  त्याची पाने चाळता चाळता आमच्या दोघांच्या सहवासातील भूतकाळातील पाने उलटत उलटत गेली.  गावातच आम्ही लहानाचे मोठे झालो. सहवासातील  आठवणी ताज्या  झाल्या. 
   नवनाथचा 'प्रेम उठाव' कविता संग्रह वाचला. प्रेमाने उठाव करून सर्व सामान्य  मनुष्य केंद्र बिंदू ठेवणारा हा कविता संग्रह भावला. अवतीभोवतीच्या लोक जीवनपद्धतीचे तरंग आणि जीवनाकडे पाहण्याची लोकांची  दृष्टीची सृष्टी  या संग्रहातील कवितेतून वाचताना जाणवते. या संग्रहातील कविता वातवरण निर्माण करून प्रसंग डोळ्यापुढे उभा करते.  जीवन जगताना घडलेले - घडत असणारे  कवितेतील प्रसंग वाचकांवर परिणाम करतात. मन गलबलून जाते. कुठे तरी अस्वस्थता निर्माण होतो.....!

        प्रेम उठाव   कवी,  आपल्या 'लेखणी' या छोट्याशा कवितेतून मोठा आशय मांडताना हृदयाने खूप साठवले आहे परतून ते सर्व लेखणीतून मांडता येत नाही ही प्रामाणिक भावना  ती  सहज  सांगताना कवितेत म्हणतो,----
लेखणी 
हृदयाने माझ्या 
खूपच साठवले  
लेखणीला मात्र 
थोडेच आठवले (पान 31) 

पुढे पान नंबर 32 वरची 'अस्वस्थ' कविता मला खूपच भावली आहे ती, ---- 

अस्वस्थ

वेदनेचे डंख आहेत
अनुभूतीचे पंख आहेत 
मला झाकता येत नाहीत 
अन् ‌मिरवता येत नाहीत
का अस्वस्थ करतेय
हे निखाऱ्यांचे जग ? 
का फुटत चाललाय 
व्यक्त अव्यक्त भावनांचा नाजूक बांध
ऐकू येतात मला
माझ्या आतल्या आवाजाच्या हाका 
त्या म्हणतात मला अरे ऊठ ! ऊठ !
ह्या काळ्या काळोखाला 
मानवाच्या आर्त दुःखाला 
आणावेच लागेल कवितेत तूला, 
कवितेत तूला
कधी शोषीत होऊन 
कधी उपेक्षीत होऊन 
कधी प्रेम वर्षावात
कधी विरहाला कवटाळून 
कधी उठाव करत 
कधी अंधाराला पेटवत 
माझ्या कवितेत मी 
असा असेन बराचसा
कवितेने मी
हृदयात तुमच्या वसेन मी !

  पुढे पान नंबर 35 वरील उठाव ही कविता , ---

(शब्दच षंढ न होता उठाव करतात तेव्हा)
उठाव
हा समतेचा उठाव आहे इथल्या खेड्यापाड्यातला गावगाड्यातला इथल्या सृष्टीमधल्या चराचरामधला

आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विषम भेदभावांचा माणुसकीला फासणाऱ्या काळिमा कुप्रथांचा !

प्रकाशदात्या, माणसांच्या अंधाराला संपवून टाक सृष्टिमध्ये, चराचरात समतेचे तत्त्व आण
अन्
इडा पिडा जाऊ दे समतेचे युग येऊ दे ! 

 या कवितेतून नवनाथची समाजातील विषमतेबद्दल खदखद जाणवते . आपण 21 व्या शतकात असूनही विचाराने किती मागास आहोत याबद्दल आपण विचार करायला हवा. हा कविता संग्रह   वाचनीय असून आपण वाचून संग्रही ठेवायला हवाच. 
 नवनाथला पुढील वाटचालीस शुभेच्छा !  

पुस्तक :- प्रेम उठाव
कवी -: नवनाथ रणखांबे
प्रकाशन :- शारदा प्रकाशन ठाणे
पुस्तक परीक्षण लेखक डॉ.कुलदीप वि . कदम 
MD Homoeopothy 
विश्रामबाग सांगली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖