सांगली, दि. ५ (जि.मा.का.) :- सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विना अडथळा व भयमुक्त वातावरणात आणि नि:पक्षपातीपणे पार पडण्याच्या दृष्टीकोनातून भारत निवडणूक आयोगाकडील सूचनांनुसार ४४-सांगली लोकसभा मतदारसंघाबाहेरील मतदार संघातून आलेले राजकीय कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्ते, सभेचे कार्यकर्ते, प्रचार कार्यकर्ते की, जे या मतदार संघातील मतदार नाहीत अशा व्यक्तींनी दि. ५ मे रोजी सांयकाळी ६ वाजलेनंतर मतदारसंघाबाहेर स्व:ताहून निघून जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यासाठी दि ७ मे रोजी मतदान होत असून निवडणूक प्रचाराचा कालावधी दि. ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता संपत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात फिरती पथके (फ्लांईग स्क्वाडस्) व स्थिर संनिरिक्षण (एस.एस.टी) अधिक दक्ष असून 50,000 रुपये पेक्षा जास्त रक्कम किंवा मौल्यवान धातू, सोने, चांदी / भेटवस्तू, जवळ बाळगणाऱ्या व्यक्तींनी सदर मालमत्ते संदर्भातील कागदपत्रे जवळ बाळगावीत,असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
उमेदवार व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे
मतदानाच्या अगोदर तीन दिवसापासून मतदान समाप्त होण्यापूर्वीच्या ४८ तासापर्यंत उमेदवाराच्या प्रचार मोहिमेची तीव्रता वाढत असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार कल्याण मंडप, कम्युनिटी हॉल, मंगल कार्यालये, लॉज, गेस्टहाऊसची कसून तपासणी करणेबाबतचे निर्देशही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. मतदारसंघाच्या हद्दीवरील चेक पोस्टच्या माध्यमातून सांगली जिल्हयामध्ये कार्यरत फ्लांईग स्क्वाडस् व एस.एस.टी.पथकाच्या माध्यमातून मतदार संघात येणा-या वाहनांची तसेच कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह मतदार संघातील असलेची खात्री करणेसाठी ओळखपत्रांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने लाच देणे-घेणे, उमेदवारांना, मतदारांना, कोणत्याही व्यक्तीला इजा पोहचवणे, धमकावणे भारतीय न्याय संहितेच्या कलम 171 बी व कलम् 171 सी नुसार गुन्हा असून असे गुन्हे करणारी व्यक्ती, दोन वर्षांपर्यंतचा तुरूंगवास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा याप्रमाणे शिक्षेस पात्र असेल. जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात तक्रार नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहे. निवडणुकीचे अनुषंगाने, लाच देण्या - घेण्याबाबत, धमकावल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली तर नागरिकांनी त्वरीत 1800 233 1801 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दयावी तसेच cVIGIL ॲपवर फोटो/व्हिडीओसह तक्रार दाखल करता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाच्या mcc.sangli@gmail.com या मेल आयडीवरही तसेच, 0233 – 2600185 या दुरध्वनी व 1950 या टोल फ्री क्रमांकावर देखील तक्रार दाखल करता येईल. नागरिकांना जिल्हास्तरावरील तक्रार नियंत्रण कक्ष (24×7) येथेही समक्ष तक्रार दाखल करता येईल .
मतदान करण्याचे आवाहन
जिल्ह्यात येत्या ७ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही समृद्ध करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖