yuva MAharashtra पशुधनाचे ईअरटॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक

पशुधनाचे ईअरटॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक



 

सांगली दि. 29 (जि.मा.का.) : पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होवून पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच पशु व पशुजन्य उत्पादन वाढीसाठी राज्यातील सर्व पशुधनाचे ईअरटॅगिंग करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 व शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुधनास ईअरटॅगिंग बंधनकारक करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर प्रविष्ट होण्यासाठी आदेश निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांना सूचित करण्यात येते की, येत्या 1 जून नंतर ईअरटॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था/ दवाखान्यामधून कोणतीही पशुवैद्यकीय सेवा देण्यात येणार नाही. तसेच त्यांच्या अधिनस्त असलेल्या कत्तलखान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैस वर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये.

सर्व महसूल, वन, वीज व महावितरण विभाग यांना सूचित करण्यात आले आहे की, नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअरटॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.

  कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअरटॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही, तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर उचित कायदेशीर /दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. दिनांक 1 जून पासून ईअरटॅग नसलेल्या पशुधनाची, बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी-विक्री व बैलगाडा शर्यत आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअरटॅग नसलेले पशुधनास बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी.

   जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, महसूल / गृह विभाग यांनी ईअर टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देवू नये. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणा (Owner Transfer) बाबतच्या नोंदी संबधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरीत अद्यावत करून घेण्याची जबाबदारी संबधित पशुपालकाची राहील.

   ग्रामपंचायतीमध्ये पशुच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देतांना पशुधनाची ईअरटॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवू नये. दाखल्यावर ईअरटॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा , या आदेशात नमुद सुचनांची व पशुसंवर्धन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सांगली जिल्ह्यातील पोलीस विभाग, वनविभाग, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद/ नगरपंचायत, ग्रामपंचायत), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व संबंधित प्रशासकिय विभागांनी काटेकोरपणे करावी. तसेच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

हेही पहा ----

https://youtu.be/ygSTG-kxWQA?si=I1USJexkXFT_3_9b

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖