सांगली दि. 17 (जि.मा.का.) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी मतदान घेण्यात आले. मतदानाची ही प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. निवडणूक प्रक्रियेबाबत कोणत्याही व्यक्तींनी कोणत्याही माध्यमातून गैरसमज अथवा दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात दिशाभूल करणाऱ्या बातम्या, संदेश यावर कोणीही विश्वास ठेवू नये. निवडणूक प्रक्रियेबाबत कांही शंका अथवा गैरसमज असल्यास संबंधितांनी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे शहानिशा करुन याबाबत खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
“सांगलीत 692 केंद्रावर मतदान यंत्र उलटे जोडले” या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या बातमी संदर्भात 44-सांगली लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली यांनी खालीलप्रमाणे स्पष्टीकरण केले आहे.
मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसारच 44-सांगली लोकसभा मतदार संघातील 1830 मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रे जोडण्यात आली. कोणत्याही मतदान केंद्रांवर ईव्हीएम उलट्या जोडल्या गेलेल्या नाहीत. मतदानाच्या दिवशी सकाळी 5.30 वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींच्या साक्षीने अभिरूप (Mock Poll) मतदान घेतले. मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन्स उलट्या जोडल्या गेल्या असत्या तर संबंधीत मतदान प्रतिनिधींच्या ही बाब लक्षात आली असती व त्यावर त्यांनी हरकत घेवून तक्रार दाखल केली असती. मतदान यंत्र उलटे जोडले गेले असते तर मशीन काम करत नाही. तथापी ईव्हीएम मशीन उलट्या जोडल्या याबाबत कुठलीही हरकत वा तक्रार कोणत्याही मतदान केंद्रावर प्राप्त झालेली नाही. सर्व मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदान सुरळीत सुरू झाले होते.
मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मा. भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक यांचे समक्ष व उमेदवार / उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदानाच्या पूर्ण प्रक्रियेची छाननी करायची असते. त्यानुसार दि. 8 मे 2024 रोजी छाननी करण्यात आलेली आहे. सदरच्या पडताळणी दरम्यान अशी कोणतीही बाब किंवा कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे निदर्शनास आले नाही. दरम्यानही कोणत्याही उमेदवाराने अथवा त्यांचे प्रतिनिधीने याबाबत आक्षेप अथवा हरकत घेतली नाही. यावेळी सदर उमेदवार यांचे निवडणूक प्रतिनिधी हे देखील उपस्थित होते. याबाबत त्यांच्याकडून आक्षेप अथवा हरकत घेतलेली नाही. सदरची प्रक्रिया पार पडलेनंतर जवळ-जवळ 9 दिवसांनी निराधार, तथ्यहिन व चुकीचा मजकूर प्रसिध्द करण्यात आला असून तो तथ्यहीन असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
सांगली लोकसभा मतदार संघांतर्गत सर्व विधानसभा मतदार संघांची झालेल्या मतदानाची आकडेवारी आजही ENCORE या ॲपवर पहाण्यासाठी उपलब्ध असून प्रत्येक मतदान केंद्रांवर उपस्थित असणारे मतदान प्रतिनिधी यांचेकडेही झालेल्या मतदानाची आकडेवारी उपलब्ध असते.
दि. 11 मे 2024 रोजी मध्यरात्री सांगली मध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवेळी पाऊस पडला. त्यामुळे पावसाच्या वाऱ्यामुळे निवडणूक कागदपत्र ठेवलेल्या स्ट्राँग रूममध्ये (ईव्हीएम स्ट्राँग रूम नव्हे) फायर अलार्म मध्ये बिघाड होवून False Alarm झाला होता. दि. 12 मे 2024 रोजी सकाळी उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी, जिल्हाधिकारी सांगली, पोलीस अधिक्षक सांगली, फायर ऑफिसर, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत विभाग) यांनी संयुक्त भेट देवून पहाणी केली असता सदर स्ट्राँग रूम बाहेरील भिंतीवरील फायर अलार्म यंत्रणेमध्ये पावसाच्या वाऱ्याने बिघाड झाला असल्याचे निदर्शनास आले. परंतू आतील बाजूस असणारा फायर अलार्म व्यवस्थित कार्यरत आहे. या ठिकाणी आगसदृश्य कोणतीही परिस्थिती निदर्शनास आलेली नाही. त्याबाबत उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले. अवेळी पावसापासून स्ट्राँग रूमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरिक्त उपाय योजना करण्यात आल्या आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त त्याच दिवशी प्रसारित करण्यात आलेले आहे.
सैनिकांना पाठविण्यात आलेल्या पोस्टल मतपत्रिका त्यांनी मतदान केल्यानंतर त्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास दररोज प्राप्त होत आहेत. याबाबतचे पत्र सर्व उमेदवारांना देण्यात आले आहे. प्राप्त पोस्टल मतपत्रिकांची आकडेवारी सर्व उमेदवारांना दैनंदिनरित्या दुपारी 3 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत देण्यात येत आहे. पोस्टल मतपत्रिका दि. 4 जून 2024 सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त होणार आहेत, त्यामुळे पोस्टल मतांचे आकडे अजून निश्चित नाहीत याही म्हणण्यात काहीच तथ्य नाही.
सांगलीत 692 केंद्रावर मतदान यंत्र उलटे जोडले” या मथळ्यात निवडणूक प्रक्रियेसंदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून याबाबत शहनिशा करुन घेणे आवश्यक होते. निवडणूक प्रक्रियेबाबत कोणत्याही माध्यमातून गैरसमज अथवा दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्यास त्यांचेवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी स्पष्ट केले आहे.
हेही पहा ----
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Youtube Link
👇
https://youtube.com/@thejanshakatinews5707
Portal Link
👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖