सांगली दि. 8 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 10 ते 12 जून 2024 या कालावधीत जिल्हा परिषद सांगली कडील गट-क संवर्गातील 754 पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सन-2023 चार परीक्षा केंद्रावर सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे.
परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास, तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस, डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे.
ही परीक्षा पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, सांगली-तासगाव रोड, बुधगाव, नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ, पेठ नाका ता. वाळवा, टेकवेअर टेक्नोलॉजी, विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधामनी, सांगली, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड वान्लेसवाडी, सांगली या महाविद्यालयाच्या ठिकाणी होणार आहे.
हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
हेही पहा ----
https://youtu.be/bHJxJucmZjo?si=ugHerhqIHDBJi6qT
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖