मागील काही वर्षांपूर्वी शिक्षणाच्या आईचा घो हा मराठी चित्रपट आला होता,येथे वाच्यार्थाने शिक्षणाच्या आईचा घो म्हणजे शिवी दिल्यासारखे वाटते पण शिक्षणाच्या आईचा घो हा मराठी वाक्यप्रचार आहे. येथे घो शब्द हा त्रास किंवा गोंधळ या अर्थाने वापरला आहे.अर्थात शिक्षणामुळे त्रास सोसावा लागत आहे. शिक्षणात प्रचंड गोंधळ आहे.अनागोंदी आहे असे सुचवायचे आहे.
शिक्षणाक्षेत्रातील गोंधळामुळे आज विद्यार्थी शिक्षक व पालकांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे.एकूण काय तर शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात गोंधळाचे वातावरण आहे. अंदाधुंद माजली आहे असेच येथे सुचवावयाचे आहे.
यावर्षीच्या नीट परीक्षेने नवनवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत.
जसे की 720 पैकी 720 गुण घेऊन रँक नंबर वन प्राप्त करणाऱ्यांची संख्या 67 आहे .एवढी प्रचंड विद्यार्थी संख्या पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.आतापर्यंत रँक वनवर एक किंवा दोन विद्यार्थी असत, आता मात्र एकदम 67 विद्यार्थी रँक नंबर वन मध्ये आलेले
आहेत.
शिवाय नीट गुणदान नियमानुसार रँक दोन वर असलेल्या विद्यार्थ्यांना 716 किंवा 715 गुण असायला हवी, कारण 180 प्रश्न.एका प्रश्नाला चार गुण याप्रमाणे 180 गुणिले 4 = 720 गुण होतात. तो रँक वन ठरतो .एक प्रश्न सोडून दिला तर 716 गुणवाला रँक टू म्हणजे दोन नंबर ठरतो. एक प्रश्न चुकला तर चार वजा गुण व एक मायनस सिस्टम प्रमाणे 715 चा देशात रँक टू किंवा दोन नंबर येतो, पण यावर्षी रँक टू किंवा दोन नंबर हा 718 किंवा 719 अशा विचित्र गुनाने आलेला आहे म्हणून गुणदान प्रक्रियेत घोळ झाला आहे गोंधळ झाला आहे हे समोर आले.असे का झाले असा प्रश्न एन. टी ए. अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीला विचारले तेव्हा ग्रेस गुणामुळे हा घोळ झाल्याचे सांगितले.ग्रेस गुण अर्थात टाईम लॉस मुळे काही विद्यार्थ्याला पेपर उशिरा दिल्यामुळे त्यांचा टाईम लॉस झाला म्हणून ग्रेस गुण दिल्याचे सांगितले.
देशात असे किती सेंटरवर टाईम लॉसचे किती विद्यार्थ्यांना गुण दिले याचे समाधानकारक उत्तर एन .टी. ए. देऊ शकले नाही .विशेष म्हणजे हरियाणातील एकाच सेंटरचे दहा ते बारा विद्यार्थी 720 गुण घेणारे आहेत हे एक आश्चर्य म्हणावे लागेल.
शिवाय त्यांचे आडनाव दिलेले नाही. बाकी माहिती मध्ये संधीग्धता आहे. एका विद्यार्थ्याने 660 गुण पडतील असे सांगितले पण प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्याला 720 गुण कसे आले हे सुद्धा न सुटणारे कोडे आहे. देशात टॉप रँक येणाऱ्या ओपनच्या विद्यार्थ्यांना केवळ 46 सीट दिल्ली एम्स मध्ये उपलब्ध आहेत ,आता मात्र जागा 46 व रँक वन असणारे 67 विद्यार्थी असे विचित्र समीकरण निर्माण झाले आहे .हरियाणातील झुजर नावाच्या सेंटरवर शिक्षकांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना ऐ व बी असे दोन प्रश्नसंच दिले गेले. कोणताही प्रश्नसंच सोडवा असे म्हणाले, मात्र नंतर चूक लक्षात आल्यानंतर एक सेट परत घेतला, येथे त्यांचा टाईम लॉस झाला म्हणून त्यांना पुन्हा ग्रेस गुण दिले गेले. विशेष म्हणजे 715 गुण घेऊन आतापर्यंत रँक दोनवर 300 विद्यार्थी आहेत यांना कोणते कॉलेज मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शेवटी गुणांचा व रँकचा घोळ कमी करण्यासाठी ज्यांचे वय जास्त त्याला वरचा रँक दिला गेला, त्यामुळे फ्रेश व गुणवान आणि कमी वय असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यावर अन्याय झाला आहे. परिणामी 650 गुण असूनही शासकीय महाविद्यालयाला प्रवेश मिळेल याची गॅरंटी देता येत नाही. सुरुवातीचे प्रश्न सोडवण्याचा वेळ लक्षात घेऊन सरासरी प्रमाणे टाईम् लॉस संकल्पना राबवून अतिरिक्त ग्रेस गुण देण्यात आले आहेत .पाटणा बिहार मध्ये चार मे रोजी नीट पेपर फुटीचा गुन्हा दाखल झाला आहे तरी नीट परीक्षा घेतलीच कशी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रेस गुण आतापर्यंत दिले नाहीत आताच कसे असे विचारले असता 13 जून 2018 च्या परिपत्रकानुसार ग्रेस गुण दिल्याचे सांगण्यात आले. जे परिपत्रक अद्याप कोणालाही माहीत नव्हते. समान गुण असतानाही एका विद्यार्थ्यांचा रँक 87 आहे तर दुसऱ्या विद्यार्थ्यांचा रँक 700 आहे याचेही समाधानकारक उत्तर एन.टी.ए .कडून मिळू शकलं नाही. एकूणच काय तर नीट परीक्षा म्हणजे गाढवाचा गोंधळ लाथाचा सुकाळ अशीच अवस्था झाली आहे. देशाचे आरोग्य सांभाळणारे डॉक्टर, देशाचे आरोग्य निर्माण करणारी यंत्रणा, डॉक्टर म्हणजे देव म्हणणारा समाज ,डॉक्टरांच्या हाती देशाचे आरोग्य, अशा महत्त्वाच्या परीक्षेमध्ये एवढा गोंधळ ही देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. या वर्षी नीट परीक्षेला जवळपास 24 लाख रजिस्ट्रेशन केले होते .या 24 लाख विद्यार्थ्याकडून सरासरी सतराशे रुपये प्रमाणे 4 कोटी 8 लाख रुपये सरकार दरबारी जमा झाले, पण परीक्षा व्यवस्थित घेता आली नाही. प्रति वर्षापेक्षा पेपर सोपा होता म्हणून यावर्षी जास्त गुण मिळाले असे कारण सांगण्यात आले. देशातील टॉप 100 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 69 विद्यार्थी एका सेंटरवरचे कसे याचेही समाधानकारक उत्तर एन. टी .ए. ला देता आले नाही. एनसीईआरटीच्या दोन वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये एकाच प्रश्नाची दोन वेगवेगळे पर्याय दिल्यामुळे काही प्रश्नांना अधिक गुण मिळाल्याचे सांगितले गेले. त्यामुळे गुण वाढल्याचे सांगितले, परिणामी 44 विद्यार्थ्याचे गुण 715 वरून 720 झाल्याचे सांगितले, काही विद्यार्थ्यांना त्यांचे दहावी व बारावीचे गुण जास्त होते म्हणून त्यांना रजिस्ट्रेशन तारखेनुसार जास्त गुण दिल्याचे स्पष्टीकरण करण्यात आले .एकूणच काय तर देशातील 540 मेडिकल कॉलेजमध्ये 80 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी, भावी डॉक्टर तयार करण्यासाठी ही नीट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला 13 लाख 16 हजार 278 विद्यार्थी बसले ,त्यापैकी तीन लाख 33 हजार 932 विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे होते ,तर सहा लाख 18 हजार 890 विद्यार्थी ओबीसी प्रवर्गाची होते, एक लाख 78 हजार 738 विद्यार्थी एस.सी .प्रवर्गाचे होते व 68,479 विद्यार्थी एस.टी .प्रवर्गाचे होते. एक लाख 16 हजार 229 विद्यार्थी इडब्ल्यूएस प्रवर्गाचे होते. असे संवर्गनिहाय विद्यार्थी असताना त्यांच त्यांच्या संवर्गाप्रमाणे गुणात्मक मूल्यमापन झाले नाही. परिणामी टाईम लॉस, ग्रेस गुण पद्धती व पेपर लीक झाल्यामुळे हजारो नव्हे लाखो विद्यार्थ्यावर अन्याय झाला आहे .डॉक्टरांच्या भरती प्रक्रियेत घोळ म्हणजे माणसाच्या जीवाशी खेळ असे म्हणावे लागेल.अद्याप अनेकांना ओ एम आर प्राप्त झाली नाही तर स्कोअर कार्ड जनरेट झाले नाही त्यांची घालमेल होत आहे
डॉक्टरांच्या भरती प्रक्रियेत घोळ म्हणजे देशाच्या आरोग्याशी खेळ असे म्हणावे लागेल ..ही अतिशय गंभीर बाब असून याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होते की काय असा प्रश्न निर्माण होतो. या सर्वावरून हेच लक्षात येते की देशाची आरोग्य यंत्रणा आत्तापासूनच व्हेंटिलेटर वर आहे. देशाची आरोग्य यंत्रणा आयसीयूमध्ये दाखल झाली आहे की काय असा प्रश्न पडतो. देशाची आरोग्य यंत्रणा अखेरचा श्वास मोजत आहे की काय असाही प्रश्न पडतो. साऱ्यात महत्त्वाचे म्हणजे एन.टी.ऐ .ने नीट चा निकाल 14 जून पर्यंत लावणार असे घोषित केले असताना अचानक देशातील बहुसंख्य लोकसभेच्या निकालामध्ये गुंग असताना अकस्मात पणे नीट चा निकाल लावला गेला. लोकसभेच्या निकालने आबकी बार 400 पार म्हणणाऱ्यांना जसा धक्का दिला तसाच धक्का नीट च्या निकालाने गुणवंत विद्यार्थ्यांना व पालकांना दिला. कारण एकाच रँक वर 720 गुण घेणारे 67 विद्यार्थी व दुसऱ्या रँक वर 300 विद्यार्थी नीटने घोषित करून नक्कीच धक्का दिला असे म्हणावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या शंभर पैकी 69 विद्यार्थी हरियाणातील एका सेंटरचे असणे हा निव्वळ योगायोग असू शकत नाही तर हा महाघोळ आहे असेच म्हणावे लागेल. हा महानिकाल नव्हे तर हा महागोंधळ होता हेच यावर स्पष्ट होते. नीट परीक्षेसाठी एक दोन तीन चार वेळा रिपीट करून हाडाची काढ व रक्ताचे पाणी करणारे विद्यार्थी एका बाजूला. अहोरात्र मेहनत करून एकाच प्रयत्नात नीट मध्ये घवघवीत यश मिळवणारे विद्यार्थी एका बाजूला, डॉक्टर होण्याचे स्वप्न आपल्या पाल्यामध्ये पाहणारे हजारो आई वडील जीवाचं रान करून काबाडकष्ट करून पाल्याला शिकवणारे पालक एका बाजूला व दुसऱ्या बाजूला पेपर लिक करून यश संपादन करणारे. एकाच सेंटरवरचे 720 गुण घेणारे, नकला करून गुणप्राप्त करणारे, 100 पैकी 69 टॉपर एका सेंटरवरचे व 300 सेकंड टॉपर त्याच परिसरातील हे पाहिले की मन विशन्न होते व मनाला प्रश्न पडतो नीट च्या आईचा घो..! शिक्षणाच्या आईचा घो या चित्रपटाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील गोंधळ अनागोंदी पालकांची अपुरी समज शाळेची जुनाटप्रणाली शिक्षणातील राजकारण यावर प्रकाश टाकला व शिक्षणाच्या आईचा घो हे वास्तव समाजासमोर मांडले तसेच नीट चा हा सर्व गोंधळ पाहिल्यानंतर मलाही प्रश्न पडला नीट परीक्षेतच्या आईचा घो ,नीट परीक्षेच्या आईचा घो .. असंच म्हणावं लागेल.
प्रा .दिलीप आनंदराव जाधव सचिव ,सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना सांगली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖