yuva MAharashtra जनावरांची अवैध वाहतूक होऊ नये याची दक्षता घ्यावी प्राणी क्लेष प्रतिबंधात्मक समितीच्या बैठकीतील सूचना

जनावरांची अवैध वाहतूक होऊ नये याची दक्षता घ्यावी प्राणी क्लेष प्रतिबंधात्मक समितीच्या बैठकीतील सूचना




            

        सांगली, दि. 13 (जि.मा.का.) :- बकरी सणानिमित्त जनावरांची कत्तल / कुर्बानी करण्यात येत असते. यावेळी महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक होऊ नये यासाठी जनावराची वाहतूक करताना वाहतूक प्रमाणपत्र असल्याची खातरजमा संबधित विभागानी करावी, अशा सूचना प्राणी क्लेष प्रतिबंधात्मक समितीच्या बैठकीत देण्यात आल्या.

        जिल्ह्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून या निमित्ताने महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्राणी क्लेष प्रतिबंधात्मक समितीची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार लीना खरात, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, सहायक आयुक्त डॉ. महादेव गवळी उपस्थित होते. तर बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पशू वैद्यकीय अधिकारी व संबधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


        दिनांक 17 जून 2024 रोजी  बकरी ईद असून 17 ते 20 जून  या कालावधीत ईद सणनिमित्त मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल किंवा कुर्बानी देण्यात येत असते. या कालावधीत जनावरांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. जनावरांची  वाहतूक करण्यासाठी प्राणी छळ प्रतिबंधक कायदा अंतर्गत वाहतूक अधिनियम 2001 मधील नियमाप्रमाणे वाहतूक प्रमाणपत्र बंधनकारक आहे.  तसेच कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत असेल तर वाहतूक होणाऱ्या जनावरांचे वाहतूकीपूर्व स्वास्थ्य तपासणी करून  विहित नमुन्यातील प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.  तसेच इयर टॅगिंग नसलेल्या जनावरांची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे पोलीस व उप प्रादेशिक परिवहन विभागाने प्रत्येक तपासणी नाक्यावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी व जनावरांची वाहतूक नियमाप्रमाणे होते का याची खातरजमा करावी.

        जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यावर पोलीस विभागामार्फत तपासणी केली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी बैठकीत दिली.  तपासणी नाक्यावर व कत्तखान्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने त्यांच्याकडील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच कत्तलखाना असलेल्या ठिकाणी महापालिका व संबधित विभागाने स्वच्छतेबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

        महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमानुसार गोवंशीय प्राण्यांची कत्तल करण्यास मनाई आहे. तसेच गर्भधारण केलेले म्हैसवर्गीय पशु व तीन महिन्यापेक्षा कमी वयाचे म्हैसवर्गीय पशु, सक्षम अधिकाऱ्याने कत्तल योग्य असे प्रमाणीकरण न केलेले पशु यांच्या कत्तलीस प्रतिबंध असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी बैठकीत सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖