BANNER

The Janshakti News

🇧 🇷 🇪 🇦 🇰 🇮 🇳 🇬  🇳 🇪 🇼 🇸  एकाच लिंक वरती पहा महत्त्वाच्या तीन बातम्या


पलूस येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : पलूस येथील गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहात राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग, अनाथ व अपंग या सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातील रिक्त जागेवर विनामुल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वसतिगृहाचे अधिक्षक मनिष पानगांवकर यांनी दिली.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पलूस तालुका व जवळील तालुक्यात इयत्ता 11 वी, अभियांत्रिकी पदविका व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम (आय.टी.आय) मध्ये नियमित शिक्षण घेत असलेल्या परगांवावरुन ये-जा करणाऱ्या (पलूस स्थानिक विद्यार्थी सोडून) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन सुरू आहे. अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करून अर्ज घेऊन जावे, असे आवाहन वसतिगृहाचे अधिक्षक यांनी केले आहे.

वसतीगृह गुणवंत मुलांचे असल्याने फक्त इयत्ता 11 वी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा व अभियांत्रिकी आय.टी.आय करीता प्रवेश पात्र असेल. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, आर्थिकदृष्या मागासवर्ग, अनाथ व अपंग या सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी मध्ये किमान 55 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत, असे वसतिगृहाचे अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

---------------------------------------------------------------------

थायोमेथोक्झामच्या बिज प्रक्रियेद्वारा करा सोयाबिनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन



सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : किटकशास्त्र विभागाने बिज प्रक्रिया करूनच सोयाबीन पीक पेरावे या संदर्भात संदेश प्रसारीत केला होता. ज्या शेतकऱ्यांनी बिज प्रक्रिया केली तेथे खोडमाशीवा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात दिसून आला. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच या किडीच्या व्यवस्थापणासाठी बिज प्रक्रिया करूनच लागवड करावी, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


या किडींचा प्रादुर्भाव पिकाचे रोपावस्थेपासूनच म्हणजे रोप 10 ते 15 दिवसाचे झाल्यानंतर होतो त्यामुळे त्याचा ताटाचे संख्येवर विपरीत परिणाम होऊन पीकाची दुबार पेरणीची शक्यता असते मात्र बिजप्रक्रिया केल्यास सोयाबीनचे पीक जवळपास 25 ते 30 दिवस पर्यंत या किडीस कमी प्रमाणात बळी पडते.


किडीचा जीवनक्रम व नुकसानीचा प्रकार - खोड माशी लहान, चमकदार काळ्या रंगाची असून त्यांची लांबी 2 मि.मी. असते. अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची २-४ मि.मी. लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळी नंतर पानाच्या देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करुन आतील भाग पोखरुन खाते. प्रादूर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोषला लसर नागमोडी भागात दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मोठ्या रोपावर असा परिणाम दिसत नाही, परंतु अशा रोपावर खोडमाशीच्या अळीचे प्रौढमाशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात, खोडात असतो. अशा किडग्रस्त रोपावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात 16-30 टक्के घट होते.


सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक किटकनाशक थायोमेथोक्झाम 30 टक्के एफ एस (उदा. पोलोगोल्ड, स्लेअर प्रो) 10 मि.ली. / 1 कि. बियाणे बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी त्यामुळे सुरुवातीच्या 25 ते 30 दिवस सोयबीन पीक खोड माशी या किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहते. बिज प्रक्रिया करताना सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया करावी त्यानंतर रासायनिक किटकनाशकाची व सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशक व जैविक संर्वधकाची बिज प्रकिया करावी. सोयाबीन पिकामधे उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर पिवळे चिकट सापळे लावून नियमीत खोडमाशीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवावे (25/हे.). ज्या ठिकणी काही कारणा अभावी सोयाबीन बियाण्यास थायोमेथोक्झामची बिजप्रक्रिया केली नसल्यास सोयाबीनचे पीक 15 दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन 50 टक्के (उदा. गोल्डमिट 50, इथिकल, टॅफेथिऑन) 30 मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के (उदा. इंडोगोल्ड प्लस, फेगो) 6.7 मि.ली. किंवा क्लोरॅट्रेनिप्रोल 18.5 टक्के (उदा. कोराजन, कव्हर लिक) 3.0 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.


या किडीच्या वाढीसाठी उष्ण तापमान जास्त आर्द्रता, भारी पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण पोषक आहे. असे वातावरण आढळल्यास शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबिन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून सतर्क राहून नियंत्रणाचे उपाय योजावेत, असे डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

----------------------------------------------------------------------

तृतीयपंथीयांसाठी 21 जून रोजी विशेष कार्यशाळा

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : तृतीयपंथीयांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे वितरीत करणे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची प्राथमिक माहिती संकलित करणे, तृतीय पंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणबाबत काही अडचणी, समस्या असल्यास त्या जाणून घेणे, या व्यक्तींच्या शासनाप्रती असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी दि. 21 जून 2024 रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली येथे होणार असून या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्तींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी National Portal for Transgender Persons हे पोर्टल दि. 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. transgender.dosje.gov.in या लिंकद्वारे तृतीयपंथी व्यक्ती ते कुठेही असतील तेथून अर्ज करू शकतात. या पोर्टलवरून अधिकाधिक तृतीयपंथीयांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे देण्यासाठी त्यांच्या माहितीचे संकलन करणे आवश्यक आहे. याकामी जिल्हास्तरीय तृतीयपंथीय तक्रार निवारण समितीच्या मान्यतेने सर्व्हेक्षण अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे.

या कार्यशाळेसाठी तृतीयंपथीय व्यक्ती यांनी त्यांचे आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड, जन्माचा दाखला, रेशनकार्ड, पासपोर्ट, पासबुक, जातीचा दाखला, मनरेगाकार्ड , शैक्षणिक पात्रताबाबत कागदपत्रे, दिव्यांग असलेस प्रमाणपत्र इ. नमूद दस्तऐवजांची छायांकित प्रत / झेरॉक्स प्रत सोबत घेवून येणे आवश्यक असेल, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖