BANNER

The Janshakti News

रमाई आवास योजनेच्या लाभासाठी संपर्क साधण्याचे आवाहन





 

        सांगली दि. 24 (जि.मा.का.) : राज्यातील ग्रामपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द व्यक्तींना पक्क्या घराचे बांधकाम करणे / कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करणे तसेच शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासाठी प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रूपये आणि शहरी भागासाठी 2 लाख 50 हजार रूपये अनुदान सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास योजनेतून दिले जाते. जिल्ह्यातील पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

        महानगरपालिका क्षेत्रासाठी – सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, जुना बुधगाव रोड सांगली व सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका या कार्यालयाशी, नगरपालिका क्षेत्राकरिता – संबंधित मुख्याधिकारी नगरपरिषद / नगरपंचायत कार्यालयाशी व ग्रामीण क्षेत्राकरिता संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज करता येईल.

        अर्ज करताना सादर करावयाची कागदपत्रेमध्ये जागेचा 7/12 उतारा / मालमत्ता नोंदपत्र / 8 अ उतारा, जातीचा दाखला, रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, आधारकार्ड, घरपट्टी / पाणीपट्टी / वीजबील इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेतून लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागासाठी व्यक्तीची उत्पन्न मर्यादा 1 लाख रूपये व शहरीसाठी 3 लाख रूपये इतकी आहे.   

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖