yuva MAharashtra माविमच्या बचत गटांतील महिलांना गणवेश शिलाईतुन मिळाला आधार - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

माविमच्या बचत गटांतील महिलांना गणवेश शिलाईतुन मिळाला आधार - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे




 

सांगली दि. १५ :- केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रम अंतर्गत शालेय शिक्षण परिषदेच्या वतीने शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमधील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेतून देण्यात येणारे गणवेश तयार करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ च्या (माविम) महिला बचत गटामार्फत केले जात असल्याने यातून महिला बचत गटांना आधार मिळाला असल्याचे मत  पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केले.


मिरज तालुक्यातील सावळी येथील केंद्रशाळेत आज पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील व मान्यवरांच्या हस्ते मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, मिरज पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.चीक्कलगी, गावाचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक शिक्षण व्यवस्थापन समिती, संबंधित केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.


जिल्ह्यातील  १० तालुके व सांगली मिरज आणि कुपवाड शहर असे १३ ठिकाणच्या शाळांना मोफत गणवेश देण्यात येणार असल्याचे माविम  वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी सांगितले. तसेच नियमित गणवेश तयार करून ते शाळांना देण्यात येणार आहेत. यामध्ये नियमित गणवेश संख्या १ लाख २५ हजार २६९ इतकी आहे. माविममार्फत स्थापित लोकसंचलित साधन केंद्रामार्फत गारमेंट युनिट, बचत गटातील महिलांना गणवेश शिलाईचे काम देण्यात आले आहे. यामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व महिलांना आर्थिक लाभ मिळावा हा मुख्य हेतू आहे. या उपक्रमातून जिल्ह्यातील एकूण १० महिला संचलित गारमेंट मधील ३७५ महिलांना रोजगार मिळाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  तालुका व केद्रातील शाळेनुसार गणवेश पॅकिंग करण्यात आले आहेत. जेणेकरून गणवेश वाटप करताना कोणतीही अडचण येणार नाही. गणवेशाच्‍या कामामुळे महिलांना मोठा आर्थिक लाभ झाल्‍याचे  माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी श्री.शिनगारे यांनी सांगितले.      

कार्यक्रमास सहायक जिल्हा समन्वय अधिकारी श्री. उमराणीकर, लेखाधिकारी श्री. कुलकर्णी, व्यवस्थापक मनोज आवटी, सहयोगिनी दिपाली पाटील तसेच नवप्रभा लोकसंचलीत साधन केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा कबाडे उपस्थित होत्या.

त्याचप्रमाणे आज कडेगाव तालुक्यातील चिंचणीअंबक, वाळवा तालुक्यातील कोरेगाव, बहादूरवाडी, गोटखिंडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे, कुकटोळी, उम्बर वडा, रांजणी येथे मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी व सीएमआरसी प्रतिनिधी यांच्या हस्ते गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या  संपूर्ण उपक्रमासाठी माविमच्या  व्यवस्थापकीय संचालक श्रीमती माया पाटोळे यांचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हेही पहा --
https://youtu.be/T_lrA-LNXHw?si=Kw9xwrE3-Q5OjmSp

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖