सांगली दि. 30 (जि.मा.का.) : सामान्य गोरगरीब माणसाला चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सांगली व मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयास आवश्यक अत्याधुनिक यंत्र सामग्री देऊन या ठिकाणच्या आरोग्य सुविधा अधिक बळकट केल्या जातील. या आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मिरज येथे बोलताना केले.
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या नवीन एमआरआय मशीनचे लोकार्पण व नूतनीकरण केलेल्या सीएसएसडी विभागाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, नूतन अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे व प्रियांका राठी यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स व विद्यार्थी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, खाजगी रुग्णालयात ज्या प्रमाणे आधुनिक यंत्र सामग्री उपलब्ध आहे, त्याच प्रमाणे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्र सामग्री व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. सामान्य माणसाला प्राधान्याने आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत शासकीय रुग्णालयांना अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय सेवांसाठी मिरज शहराचा मोठा लौकिक आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून आरोग्य सेवांसाठी अधिकचा निधी दिला ही बाब कौतुकास्पद आहे. या निधीमुळेच नवीन एमआयआर मशीन रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले. सांगली व मिरज येथील शासकीय रुग्णालयास लागणाऱ्या आवश्यक यंत्र सामग्रीसाठी व आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील मुला-मुलींच्या वस्तीगृहाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवावा. या दुरुस्तीच्या कामास मान्यता व निधी दिला जाईल. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात हृदयरोग विभाग सुरू करण्याबाबत मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेऊन येथून बाहेर जाणाऱ्या भावी डॉक्टरांनी समाजातील गोर गरीब रुग्णांची सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले.
सांगली मिरज शहरे आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जातात. सामान्य माणसाला दर्जेदार व कमी खर्चात आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने नेहमी प्राधान्य दिले असून सांगली, मिरज मधील शासकीय रुग्णालयांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन दिल्या जातील, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ते म्हणाले मिरज महाविद्यालयाच्या रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २५ कोटीचे एमआरआय मशीन उपलब्ध झाल्याने या भागातील रुग्णांच्या उपचारासाठी याची मोठी मदत होईल. कमी खर्चात अचूक निदान झाल्याने पुढील उपचारासाठी त्याचा लाभ होईल. तसेच सी.एस.एस.डी विभागामुळे दान केलेले अवयव आणि वैद्यकीय साधन सामग्रीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होईल.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, कोरोना काळात मिरज रुग्णालयाने चांगले काम केले आहे. या ठिकाणी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल बाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मिरज येथील शासकीय रुग्णालयांमधील आवश्यक पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जाईल.
अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कोरोना काळात रुग्णालयाने चांगले काम केले आहे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन सुविधा निर्माण होत असल्याने याचा सामान्य रुग्णांना लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांचा सेवा निवृत्तीनिमित्त मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व नूतन अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांचे स्वागत करण्यात आले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖