सांगली, दि. ११ (जि.मा.का.) :- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके वेळीच उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने अधिक दक्षता घेऊन बी- बियाणे, खते, कीटकनाशके यांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज खरीप हंगाम २०२४ च्या अनुषंगाने कृषी विभागाचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील उपस्थित होते. तर बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सेवा केंद्रांचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशकांचा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना त्वरित तो उपलब्ध व्हावा. या बरोबरच बोगस बी- बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी. या संदर्भात जिल्ह्यात कोणतीही तक्रार येऊ नये यासाठी कृषी विभागाने सर्तक रहावे. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राकडे उपलब्ध असलेल्या साठ्याची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करावी. कृषी सेवा केंद्राकडे उपलब्ध साठ्याची माहिती ग्रामपंचायत व गावचावडीमध्ये प्रसिद्ध करावी.
पीक कर्ज वाटपाचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत आढावा घेतला. ते म्हणाले, ३० जून पर्यंत पीक कर्ज वाटप पूर्ण करावे. याबाबत तालुकास्तरावर पीक कर्ज वाटपाचा आढावा घ्यावा. कृषी विभागाने पीक विमा योजना जनजागृती करावी. गतवर्षी शेती पिकांच्या झालेल्या नुसनीच्या मदतीसाठी ज्यांचे KYC अपडेट झालेले नाही त्यांच्याकडून KYC अपडेट करून घ्यावे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पेरणी बाबतचा सल्ला द्यावा. हा सल्ला देताना पीकनिहाय देण्यात यावा. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत. पंचनामे करताना जिओ टॅगिंग करावे,अशा सूचना त्यांनी दिल्या.
पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकरी खातेदाराच्या खात्यावर जमा होण्यासाठी ज्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले नाही त्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी बैठकीत दिल्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖