yuva MAharashtra ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना लाभासाठी जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 लाख 19 हजार 681 महिलांची नोंदणी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना लाभासाठी जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 लाख 19 हजार 681 महिलांची नोंदणी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


 नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ चा अर्ज

 

        सांगली, दि. 12 (जि.मा.का.) : राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’  योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत  1 लाख  19 हजार 681 महिलांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये 58 हजार 679 महिलांनी ऑनलाईन तर 67 हजार 2 महिलांनी ऑफलाईन नोंदणी केली आहे. या प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज योजनेबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेत दिली.

            जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’  योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामुल्य आहे. पात्र महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

                    जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

            महिलांना या योजनेचा अर्ज ‘नारी शक्ती दूत’ या ॲपवरूनही भरता येणार आहेत. ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांनी गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, लाभार्थी महिलांना हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल. अर्जासमवेत भरावयाची माहिती कागदपत्रे अशी : आधार कार्डची प्रत (दोन्ही बाजूने), महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र सादर करावे). परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे. नवविवाहीत महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

            महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली असून या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेच्या अनुषंगाने काही अडचणी आल्यास जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सांगली अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सांगली यांच्याशी सपंर्क साधावा.

          उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे.) मात्र, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे. त्यासाठी  रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल. यादी जाहीर केलेल्या दिनांकापासून पाच दिवसांपर्यंत तक्रार  नोंदविता येईल. तक्रर अंगणवाडी सेविका / मुख्य सेविका / सेतु सुविधा केंद्रामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे नोंदविता येईल. तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत असून तक्रार निवारणानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल.

              गावपातळीवर ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असणार आहेत. या समितीमार्फत गावपातळीवर शिबीर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने नोंदणी करावयाची आहे. महापालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖