पलूस/कुंडल दि. १२ : वार्ताहरक्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली यांचा " उक्तृष्ट ऊस विकास संवर्धनाचा" देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याचे कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले 2022-23 सालात जास्त साखर उताऱ्याच्या विभागात ऊस विकासात भरीव काम करणाऱ्या कारखान्याना हा पुरस्कार देणेत येतो. हे आमदार अरुणअण्णा लाड यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
लाड म्हणाले, देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्याआधारे अनेक बाजूंनी कारखान्यांचा अभ्यास केला जातो. यातीलच एक ऊस उत्पादकता हा असून आपल्या कारखान्याला त्यातील काटेकोर मूल्यमापन करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हे पारितोषिक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज जाहीर केले. याप्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.
कारखान्याने ऊस विकास आणि ऊस क्षेत्र वाढीसाठी केलेले भरीव काम, पाण्याचा योग्य वापर आणि खतांचा कार्यक्षम वापर करून कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न घेणेसाठी केलेले प्रयत्न. पाचट कुजवून सेंद्रिय कर्ब वाढीसाठी केलेले प्रयत्न आणि यातून सकारात्मक आलेले निष्कर्ष, नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहीचवून त्याचा स्वीकार करून त्यानुसार ऊस क्षेत्रात केलेली आधुनिक क्रांती या सगळ्याचा विचार करून हा पुरस्कार जाहीर झाल्याचे त्यांनी सांगितले.यंदाच्या वर्षीचा पारितोषिक वितरणाचा विशेष सोहळा नवी दिल्ली येथे ऑगस्ट मध्ये होत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖