BANNER

The Janshakti News

पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, सेल्फी काढण्यास मनाई




 

         सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : चांदोली व कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदी पात्रात वाढ झाल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरीक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. आयर्विन पुलावरुन तसेच नदी काठावरील असणाऱ्या गावांमध्ये काही तरुण मुले व नागरीक पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, स्टंटबाजी करून सेल्फी घेत असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 27 ठिकाणी व त्यापासुन 100 मिटर परिसरात पूर परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भारतीय नागरीक संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दिनांक 26 जुलै 2024 ते 6 ऑगस्ट 2024 या कालावधीसाठी पुढीलप्रमाणे मनाई आदेश जारी केला आहे.

            संबंधित ठिकाणांच्या 100 मीटर परिसरात 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी विनाकारण जमण्यास फिरण्यास, वावरण्यास, उभा राहण्यास, पाणी पाहण्यासाठी जाण्यास तसेच फोटो सेशन करण्यास, व्हिडीओ ग्राफी करण्यास, रील्स बनविण्यासाठी जाण्यास मनाई केली आहे.

            मनाई करण्यात आलेली पोलीस ठाणे हद्दितील ठिकाणे पुढीलप्रमाणे - सांगली शहर - आयर्विन पूल, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट. सांगली ग्रामीण - हरिपूर – नदीघाट, कसबेडिग्रज – कृष्णा नदी पूल, कवठेपिरान – सातसय्यद दर्गा, माळवाडी – कुंभोज पूल, दुधगाव – खोची पूल. मिरज ग्रामीण - म्हैशाळ बंधारा. महात्मा गांधी चौक - कृष्णा घाट ते अर्जुनवाड पूल, कृष्णा घाट. मिरज शहर - म्हैशाळ रोड वांडरे कॉर्नर. आष्टा - शिरगाव बंधारा, शिगांव पूल, वाळवा (हाळभाग) ते कारंदवाडी रस्ता. इस्लामपूर - बहे पूल, ताकारी पूल. शिराळा - सागांव वारणा नदी पूल. कोकरूड - चरण पूल, आरळा पूल कोकरूड पूल. भिलवडी - भिलवडी पूल, औदुंबर मंदिर, आमणापूर पूल, नागठाणे बंधारा, सुखवाडी ते तुंग नवीन पूल. विटा - कमळापूर ते रामापूर जाणारा पूल.

            हा आदेश दि. 26 जुलै 2024 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते  दि. 6 ऑगस्ट 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖