yuva MAharashtra महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी





·       पंतप्रधानांच्या हस्ते ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन.

·        गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्याचे भूमिपूजन. 

·       मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ. 

·       कल्याण यार्ड रिमॉडेलींग प्रकल्प पायाभरणी.

·        लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्मचे राष्ट्राला समर्पण.

·        छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विस्तारित प्लॅटफॉर्म क्र. 10 आणि 11 चे राष्ट्राला समर्पण.

·        तुर्भे गति शक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल प्रकल्पाची पायाभरणी.

            मुंबई, दि. 13 - मुंबई हे देशाचे पॉवर हाऊस असून महाराष्ट्राला जगातील शक्ती केंद्र आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणे हे स्वप्न असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले.             प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 29 हजार कोटींहून अधिक किमतीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे रिमोटद्वारे शुभारंभ, भूमिपूजन, पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. गोरेगाव मधील नेस्को प्रदर्शन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा,  आदी उपस्थित होते.


वाढवण बंदर प्रकल्पामुळे 10 लाख रोजगार निर्मिती होणार

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, मागील काही वर्षात मुंबई आणि परिसराची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. येत्या काही वर्षात ती अधिक चांगली होईल. राज्यात विविध विकास प्रकल्प उभारले जात असून यामुळे रोजगार देखील वाढत आहे. वाढवण बंदराला नुकतीच मंजुरी देण्यात आली असून 76 हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे दहा लाख रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे आकर्षण केंद्र बनले असून केंद्र आणि राज्य सरकार अधिक वेगाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र पर्यटनाचे हब बनावे

            महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे महाराष्ट्र हे उद्योग क्षेत्राचे शेती क्षेत्राचे तसेच वित्तक्षेत्राचे शक्ती केंद्र आहे. पर्यटन क्षेत्राला येथे मोठा वाव असून हे पर्यटनाचे हब बनावे अशी अपेक्षा प्रधानमंत्री        श्री मोदी यांनी व्यक्त केली. देशातील नागरिकांना गतीने विकास हवा असून यात मुंबईसह महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्रातील नागरिकांचे जीवन अधिक दर्जेदार करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले सागरी किनारा मार्ग अटल सेतू अशा प्रकल्पांमुळे नागरिकांना मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले दहा वर्षांपूर्वी मुंबईत आठ किलोमीटर मेट्रो धावत होती आज ती 80 किलोमीटर धावत असून 200 किलोमीटर मेट्रो नेटवर्कवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

            आज भूमिपूजन होत असलेल्या मुंबईतील प्रकल्पांमुळे प्रवासाच्या वेळात वेळेत मोठी बचत होणार असल्याचे सांगून कनेक्टिव्हिटी वाढल्याने सर्वांना लाभ होणार असल्याचे श्री.मोदी म्हणाले. विविध तीर्थयात्रांमध्ये सुविधा वाढवणार असल्याचा उल्लेख करून पंतप्रधान श्री.मोदी यांनी पंढरपूर वारीसाठी पालखी मार्ग लवकरच सेवेत येतील असे सांगितले. राज्यात युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती दिली जात आहे. याचा  युवकांना मोठा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले. राज्यात सर्वसामान्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.


पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर मागील दहा वर्षात देशाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे राज्यातही विविध विकास प्रकल्प पूर्ण होत असून विकासकामांना नवी गती मिळाली आहे. पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यातील प्रत्येक योजनेला प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा पाठिंबा मिळतो आहे. उद्योगस्नेही राज्य अशी महाराष्ट्राची ओळख पुन्हा निर्माण होत आहे. आज भूमिपूजन होत असलेल्या प्रकल्पांचे लोकार्पण देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होईल तसेच सुरक्षित, सुशोभित आणि भक्कम मुंबई घडवायची आहे त्यासाठी प्रधानमंत्री यांची साथ मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


पायाभूत सुविधांच्या जाळ्यांमुळे मुंबईचे चित्र बदलणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या पाठिंब्यामुळे मुंबईत विविध विकासकामे होत असून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांचे नाव इतिहासात लिहिले जाईल. 2018 साली राज्याने मुंबईत कोठेही एका तासात प्रवास करता येईल अशी कनेक्टिव्हिटी तयार करण्याचा संकल्प केला होता, आज भूमिपूजन होत असलेल्या प्रकल्पांमधून ते साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत होत असलेले विविध प्रकल्प हे पायाभूत सुविधांचे चमत्कार आहेत. या प्रकल्पांमुळे भविष्यात मुंबईचे संपूर्ण चित्र बदललेले असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तरूणांना दिशा मिळेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्य शासन लोकहिताचे निर्णय घेत असून विविध लोककल्याणकारी प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहेत. युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तरुणांना दिशा दाखवण्याचे काम होणार असल्याचा त्यांनी उल्लेख केला. 

 


 

प्रकल्पाविषयी माहिती

·       मुंबईतील गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शन केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री यांनी 29 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली. 

·       ठाणे बोरिवली हा 16,600 कोटी रुपये खर्चाचा बोगदा प्रकल्प आहे.  ठाणे आणि बोरिवली दरम्यान हा दुहेरी ट्यूब बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. यामुळे बोरिवलीच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाणे कडील ठाणे घोडबंदर रोड दरम्यान थेट संपर्क व्यवस्था निर्माण होईल. प्रकल्पाची एकूण लांबी 11.8 किमी आहे. यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास 12 किमीने कमी होईल आणि प्रवासाच्या वेळेत सुमारे एक तासाची बचत होईल. 

·       गोरेगाव मुलुंड लिंक रोड या 6300 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पायाभरणी  केली. गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुलुंड येथील पूर्व  द्रुतगती महामार्ग या दरम्यान रस्ता जोडणे ही गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची कल्पना आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची एकूण लांबी अंदाजे 6.65 किलोमीटर आहे आणि पश्चिम उपनगरांना नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे मुंबई एक्स्प्रेस वे शी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

·       मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. हा एक परिवर्तनकारी आंतरवासिता कार्यक्रम असून 18 ते 30 या वयोगटातील तरुणांना कौशल्य सुधार आणि उद्योगाभिमुखतेच्या संधी देऊन तरुणांमधील बेरोजगारीची समस्या सोडवणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे. यासाठी सुमारे 5540 कोटी रुपये खर्च होणार आहे. 

·       कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेच्या कामाची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी केली. कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरी रेल्वे गाड्या यांच्या वाहतुकीचे पृथक्करण करण्यात मदत होईल. या पुनर्रचनेनंतर अधिक गाड्यांची वाहतूक हाताळण्यासंदर्भात यार्डाच्या क्षमतेत वाढ होईल, रेल्वेगाड्यांची कोंडी होणे कमी होईल आणि गाड्यांचे परिचालन करण्यासंदर्भात यार्डाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल. यासाठी 813 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

·       नवी मुंबईमध्ये तुर्भे येथील गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल 32,600 चौरस मीटर्सहून अधिक क्षेत्रावर उभारले जाणार असून हे टर्मिनल स्थानिक जनतेसाठी अतिरिक्त रोजगार संधी निर्माण करेल आणि सिमेंट तसेच इतर वस्तूंच्या हाताळणीसाठी आवश्यक अतिरिक्त टर्मिनलची गरज पूर्ण करेल. हा प्रकल्प 27 कोटींचा असेल.

·       प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवे फलाट (प्लॅटफॉर्म) तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील फलाट क्र. 10 आणि 11 चा विस्तारीत भाग यांचे लोकार्पण देखील झाले. लोकमान्य टिळक टर्मिनसमधील नवे, अधिक लांबीचे फलाट जास्त लांबीच्या गाड्यांसाठी सुयोग्य ठरतील आणि प्रत्येक गाडीत अधिक प्रवाशांची सोय होईल. तसेच प्रवाशांच्या वाढलेल्या वाहतुकीचे नियमन करण्याची रेल्वे स्थानकाची क्षमता देखील यामुळे सुधारेल. यासाठी 64 कोटींचा खर्च आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्र. 10 आणि 11 यांची लांबी 382 मीटरने वाढवण्यात आली असून या भागावर सावलीसाठी आच्छादन तसेच गाडी धुण्याच्या दृष्टीने या भागातील रेल्वे रुळांवर विशेष सोय देखील केलेली आहे. या विस्तारामुळे या फलाटाची क्षमता तब्बल 24 डब्यांची गाडी उभी राहण्याइतकी वाढली आहे. यासाठी 52 कोटी रुपये खर्च आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖