सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाबाबत विशेषत: ग्रामीण स्तरावर जास्तीत जास्त जनजागृती करावी. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, जिल्हा परिषद माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. मुजाहिद आलासकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, विक्रीस बंदी असलेल्या सुगंधी तंबाखु, मावा विक्री करणाऱ्या पानटपरीवर कडक दंडात्मक कारवाई करावी. रेस्टॉरंट, बार, बसस्थानक, रेल्वेस्टेशन इत्यादी सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर अन्न औषध प्रशासन व पोलिस विभागामार्फत कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हा सल्लागार डॉ. मुजाहिद आलासकर यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, समिती सदस्य, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षांतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖