टॉमेटो ठरु शकतो पित्तप्रकोपाचं कारण.....!
आंबट रस हा शरीराला हितावह आहे. आंबट चवीचे पदार्थ भूक वाढवतात, पचन सुधारतात, नवनिर्मिती करतात वगैरे लाभ आरोग्याला असले तरी आंबट रसाचा अतियोग हा पित्तप्रकोपास कारणीभूत सुद्धा होऊ शकतो, हे तर समजले. पण मुळात एवढ्या अधिक प्रमाणात आंबट कोण खातो, असा प्रश्न तुमच्या मनात येईल. कारण सर्वसाधारण मनुष्य आंबट कमी खात असल्याने अनेकदा उलट ‘आंबटाची कमतरता’ ही त्याची स्वास्थ्य बिघडवण्यास व पर्यायाने रोगप्रतिकारशक्ती घटवण्यास कारणीभूत असते. त्यामुळे आंबट रसाचे पर्याप्त मात्रेत सेवन व्हायला हवे, असा सल्ला त्यांना द्यावा लागतो, तो विषय वेगळा. इथे प्रश्न आहे तो पित्तप्रकोपाचा.
आजच्या घडीला तुमच्या-आमच्या आहारामध्ये टॉमेटो सॉस-टॉमेटो केचप यांचे प्रस्थ फार वाढले आहे. काही घरांमध्ये तर लहान मुलांना सॉस आणि केचपशिवाय जेवण जात नाही, अशी परिस्थिती आहे. या सॉस-केचपमुळे सकाळी नाश्त्याबरोबर टॉमेटो, जेवणाबरोबर टॉमेटो, सायंकाळच्या स्नॅक्सबरोबर टोमॅटो आणि रात्री जेवणाबरोबरसुद्धा तोंडी लावायला टॉमेटोच! हे आहे आजच्या जगातले आंबट रसाचे अतिसेवन. गंमत म्हणजे भारतामध्ये जेव्हा टॉमेटोचा वापर सुरू झाला तेव्हा आपल्या बापजाद्यांनी हे फळ आपल्या हिताचे नाही, असेच म्हटले होते. टोमॅटोमध्ये काही पोषक गुण आहेत हे स्वीकारुनसुद्धा त्याचे अतिसेवन पित्तप्रकोपास कारणीभूत होत आहे, हे २१व्या शतकातल्या भारतीय समाजाने ओळखले पाहिजे.
सर्व आंबट पदार्थ हे पित्तवर्धक असले तरी ’आवळा व डाळींब’ हे त्याला अपवाद आहेत अर्थात आवळा व डाळींब हे पित्त वाढवत तर नाहीत, उलट पित्तशामक आहेत.
आंबट रस
पित्तप्रकोपास अर्थात शरीरामध्ये स्वास्थ्य बिघडवेल इतपत पित्त वाढवण्यास ज्या गोष्टी कारणीभूत होतात, त्यामध्ये तिखटाप्रमाणेच ’अम्ल अर्थात आंबट’ चवीचे पदार्थ सुद्धा कारणीभूत होतात. आपण सर्व साधारण पणे असे समजतो की पित्त वाढवण्यास महत्त्वाचे कारण तिखट पदार्थ आणि आंबट चवींनी पित्त तितकेसे वाढत नसावे असा आपला एक समज असतो. मात्र तिखट, खारट व आंबट या तीन पित्तवर्धक रसांमध्ये आंबट हा तिखट व खारटापेक्षाही अधिक पित्तकर आहे. असे चरकसंहितेचे भाष्यकार चक्रपाणी सांगतात.
आंबट रस हा प्रत्यक्षात जिभेवर चव आणणारा, अन्नामध्ये रुची निर्माण करणारा, भूक वाढवणारा आणि अन्नपाचक आहे. त्यामुळे जिथे या तक्रारींनी माणूस त्रस्त असतो, तिथे अम्ल रसाचा चांगला फ़ायदा होतो. वास्तव जीवनातही आपण त्याचा अनुभव घेतो. लिंबू चोखले की तोंडाला चव येते, चिंचेच्या तर नुसत्या दर्शनाने ,काही जणांना तर आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटतं.
अपचन-पोटदुखीवर गरम पाण्यामधून घेतलेला लिंबाचा रस उपयुक्त ठरतो. जेवणामध्ये कोकम वापरण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे,जी आंबट रसाचे पचनामधील महत्त्व दर्शवते.
मांसाहारानंतर सोलकढी का हवीहवीशी वाटते...?
सेवन केलेल्या मांसाचे-माशांचे नीट पचन व्हावे म्हणूनच!
मग असे असतानाही आंबट चवीचे पदार्थ पित्तप्रकोप करतात, असे कसे...?
आंबट रसाचे हे अग्नी (भूक व पचना) वरील कार्य होते, ते त्यामधील अग्नी तत्त्वामुळे.आंबट रस हा जात्याच उष्ण आहे, कारण तो बाहुल्याने तेज (अग्नी) व भूमी या तत्त्वांनी बनलेला आहे.दुसरं म्हणजे पित्त सुद्धा अम्ल रसाचे असते आणि साहजिकच आंबट रसाच्या अतिसेवनाने आंबट पित्त अधिक तीव्रतेने व अधिक प्रमाणात वाढते. त्यामुळे तुम्ही जेव्हा-जेव्हा आंबट चवीच्या पदार्थांचे अतिसेवन करता, तेव्हा-तेव्हा शरीरामध्ये अग्नी (उष्णता) वाढते व पित्तप्रकोप होण्याचा धोका संभवतो. अर्थात इथे अतिसेवन हा शब्द महत्त्वाचा आहे.
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖