yuva MAharashtra मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी पहिल्या टप्प्यातील अर्ज स्विकारण्यास 19 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी पहिल्या टप्प्यातील अर्ज स्विकारण्यास 19 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ



          सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यास दि. 7 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापी ग्रामपातळीवर, तालुकास्तरावर, महानगरपालिकास्तरावर जेष्ठ नागरीकांना अर्ज करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पहिल्या टप्प्यातील अर्ज स्विकारण्यास दि. 19 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, असे समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

          वय वर्षे 65 व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यास त्याच्या आधारसंलग्न खात्यावर तीन हजार रूपये एकदाच वर्ग करण्यात येणार आहेत.

          या योजनेच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहुन मुदतीत प्राप्त झालेल्या पात्र लाभार्थ्यांना त्वरीत लाभ दिला जाणार आहे. वरील मुदतीनंतर देखील या योजनेचे अर्ज स्विकारले जाणार आहेत. अर्जासोबत विहीत स्वघोषणापत्रे, आधार कार्ड झेरॉक्स, उपकरण हवे असलेबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, दोन फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, उत्पन्नाचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. 
अर्ज विनामुल्य असून जवळचे ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, समाज कल्याण कार्यालय, सांगली यांचेकडून उपलब्ध करुन घ्यावेत व परिपुर्ण अर्ज त्यांचेकडेच विहित मुदतीत सादर करावेत. 

या योजनेचा सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖