सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्हा प्रशासनाच्या वतीने व मे. चौरंग संस्था मुंबई यांच्या सहाय्याने सांगली येथे विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग सांगली येथे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेस सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, एनसीसी बटालियनचे सुभेदार दिपक कुमार, होमगार्ड चे केंद्र नाईक जगदिश नागदिवे, क्रीडा मार्गदर्शक सिमा पाटील, एनएसएस समन्वयक डॉ. रूपाली कांबळे यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धा क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग ते टाटा पेट्रोल पंप चौक व परत त्याच मार्गाने क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग येथे स्पर्धेची सांगता झाली. स्पर्धेचे अंतर साधारण 2 कि.मी. होते. या स्पर्धेत विविध शाळा महाविद्यालयातील एनसीसी चे विद्यार्थी-विद्यार्थिनी, होमगार्ड, आपदा मित्र, एनएसएस, स्वयंसेवी संस्था, आयुषी हेल्पलाईन, रॉयल बोट क्लबचे सदस्य, एनडीआरएफ चे जवान यांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत पुरूष गटात प्रथम क्रमांक विजय केंचाप्पा काळे, व्दितीय क्रमांक श्रीधर बेसवाणी कांबळे व तृतीय क्रमांक प्रमोद संतराज पाटील या एनसीसी च्या विद्यार्थ्यांनी पटकावला. महिला गटात प्रथम क्रमांक दिक्षा वाघमारे, व्दितीय करूणा जाधव व तृतीय क्रमांक योगिता मोरे या एनसीसी च्या विद्यार्थीनिंनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖