BANNER

The Janshakti News

अटल भूजल योजनेंतर्गत कवठेमहांकाळ येथे जिल्हास्तरीय भूजल मित्र कार्यशाळा संपन्न



 

            सांगली दि. 19 (जि.मा.का.) : केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमानने अटल भूजल योजनेंतर्गत माहिती शिक्षण व संवाद घटकाअंतर्गत ग्रामपंचायतस्तरावरील सयंत्राचा वापर, पर्जन्यमान, भूजल पातळी मोजमाप व नोंदी या विषयावर एकदिवसीय भूजल मित्र कार्यशाळा दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी शाहि दरबार हॉल कवठेमहांकाळ येथे आयोजित करण्यात आली. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सांगलीच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजाता सावळे व कनिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले.


            यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजाता सावळे यांनी सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादी योजनांच्या माध्यमातून होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये एककेंद्रभिमुखता साध्य करणे, जलसंपदा विभाग, कृषि विभाग, भूजल पुर्नभरण, रोजगार हमी योजना, विहिर पुर्नभरण, बंधारे, शोषखड्डे यांची कामे प्राधान्याने राबविणे, भुजलाच्या शाश्वत विकासाकरिता जिल्हा व ग्राम पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे, सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करुन उपलब्ध पाण्याचा वापर मर्यादित करणे, सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे व सर्व बागायती क्षेत्र 100 टक्के ठिबक व तुषार सिंचनाखाली आणणे याबाबत मार्गदर्शन केले.

            प्रास्ताविकात कनिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे यांनी अटल भूजल योजना व भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे होत असलेली भूजल पातळीतील घसरण थांबविण्याकरीता केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भुजल (अटल जल) योजना राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याचे सांगून गावांमध्ये मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) वेगवेगळ्या विभागाच्या जसे मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक, जलसंधारण, इत्यादी योजनेद्वारे अभिसरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. भूजल गुणवत्ता सुधारणे किंवा अबाधीत राखणे. मागणी आधारीत (पाणी बचतीचे उपाय योजना) व पुरवठा आधारीत (जलसंधारण व भुजल पुर्नभरण) व्यवस्थापनाच्या सुत्राचा अवलंब करुन भुजल साठ्यात शाश्वता आणणे, भूजल पातळीची घसरण थांबविणे व पाणी गुणवत्तेत सुधारणा करणे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

यशदाचे मास्टर ट्रेनर मधुकर देशमुख यांनी ग्रामपंचायत प्रशिक्षणात लोकसहभाग व अटल योजनेत ग्रामपंचायतस्तरावरील शाश्वत भूजलाचे व्यवस्थापन, पाण्याचा ताळेबंद तयार करणे याबाबत मार्गदर्शन केले.  यशदाचे मास्टर ट्रेनर श्रीपाद जोशी यांनी आदर्श सरपंच व आदर्श ग्रामपंचायत मध्ये राबविण्यात येणारे उपक्रम व भूजल समृध्द ग्रामपंचायत करण्याकरीता करावी लागणारी कामे, भूजल व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतस्तरावरील सर्व सयंत्राचा वापर व नोंदी घेण्याबाबत जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्था वनराईचे भूवैज्ञानिक आंनदा घेवदे यांनी पर्जन्यमान मोजमाप, वॉटर लेवल इंडीकेटर, फ्लो मिटर, FTK किट, पिझ्झोमिटर याबाबत सादरीकरण केले.

सूत्रसंचालन माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कुणाल शितोळे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील अटल योजनेत समाविष्ठ 94 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य, भूजल मित्र, जलसुरक्षक, पाणी पुरवठा कर्मचारी, व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे सर्व अधिकारी कर्मचारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील सर्व तज्ज्ञ, जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्थेचे तज्ज्ञ व सर्व समूह समन्वय उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖