सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : मध्य रेल्वेच्या पुणे विभागावरील भिलवडी - नांद्रे स्थानकादरम्यान किर्लोस्करवाडी रेल्वे फाटक क्र. 119 कि.मी. 256/6-7 येथील वसगडे गाव ते नागाव, निमणी गाव दरम्यानचा राज्य महामार्ग क्र. 142 हा दि. 13 ते 27 ऑक्टोबर 2024 या कालावधीत बंद करून, सदर गेट वरून होणारी वाहतूक अन्य मार्गे वळविण्याबाबत तसेच वाहतूक सुरक्षा उपाययोजनेव्दारे वाहतूक नियंत्रीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्गमित केले आहेत.
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांच्या मागणीच्या अनुषंगाने वसगडे ते निमणी येथील रेल्वे गेट भिलवडी – नांद्रे स्टेशन दरम्यान आर.ओ. बी. चे काम चालू असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून हे आदेश निर्गमित केले आहेत.
सांगली शहरातून पलूस, कडेगाव, कराड शहराकडे जाणारे व पुन्हा सांगली शहराकडे येण्यासाठी वाहनांचा मार्ग - कॉलेज कॉर्नर चौक - बायपास रोड – शिवशंभो चौक - उजवीकडे वळण घेऊन कर्नाळ रोड - कर्नाळ गांव - नांद्रे गाव - वसगडे गावातून डावीकडे वळण घेऊन भिलवडी रोड - माळवाडी येथून पूर्वेकडील बाजूस (उजवीकडे) वळण घेऊन चितळे डेअरी - भिलवडी रेल्वे स्टेशन रोड - हजारवाडी डेपो - पाचवा मैल मार्गे - उत्तरेकडे (डावीकडे) वळण घेऊन पलूस, कुंडल, बांबवडे, कडेपूर, कडेगाव, मार्गे कराड येथे जाता व येता येईल.
त्याचबरोबर सांगली शहरातून जड वाहनासाठी व एस.टी बसेस यांना संजयनगर 100 फूटी रोड - संपत चौक - माधवनगर रोड - माधवनगर - बुधगाव – कवलापूर - कुमठे फाटा - तासगाव शहरातून डावीकडे वळण घेऊन पाचवा मैल मार्गे पलूस, कडेगाव, कराडकडे जाता व येता येईल. तसेच हलक्या वाहनांसाठी सांगली शहरातून कॉलेज कॉर्नर चौक - पट्टणशेट्टी होंडा शोरुम कॉर्नर - चिंतामणीनगर नवीन रेल्वे बीज मार्गे वरील मार्गाने जाता व येता येईल. नागांव / निमणी गावातील नागरिकांना देखील सांगली शहरात येण्या व जाण्यासाठी वरील मार्गाचा वापर करता येईल.
वरीलप्रमाणे पर्यायी मार्गावरील वाहतुकीस पुढील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे. (१) नमूद ठिकाणी काम चालू करीत असताना पाचवा मैल चौक व वसगडे गावाजवळ तसेच रेल्वे फाटकाजवळील ओव्हरब्रीज जेथे सुरु होतो व जेथे संपतो अशा ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस काम चालू असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे, असे मोठ्या अक्षरातील माहितीदर्शक फलक लावण्यात यावेत. (२) रात्रीच्या वेळी वाहनधारकांना दिसेल अशा पध्दतीने पाचवा मैल चौक व वसगडे गावाजवळ तसेच रेल्वे फाटकाजवळील ओव्हरब्रीज जेथे सुरू होतो व जेथे संपतो अशा ठिकाणी मोठ्या आकाराचे दिशादर्शक फलक, रेडीयम रिफ्लेक्टर आणि ब्लिंकर्स लावण्यात यावेत. (३) ज्या ठिकाणी काम होणार त्या ठिकाणी पर्यायी रस्त्याच्या दोन्ही बाजूस 24 तासाकरीता महारेल ठेकेदार यांनी त्यांच्याकडील सुरक्षारक्षक नेमावेत. (४) सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूस संपूर्ण रस्त्यावर रात्री विद्युत पुरवठा चालू राहील याची महारेल आणि ठेकेदार यांनी गांभीर्याने दक्षता घेण्याची आहे. (५) काम चालू असताना अपघात झाल्यास किंवा अन्य काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार महारेल आणि संबंधित ठेकेदार असतील. (६) कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर महारेल आणि संबंधित ठेकेदार यांनी कामाच्या ठिकाणी स्वतःच्या जबाबदारीवर रेल्वे पोलीस प्रशासनाकडून पोलीस अंमलदार उपलब्ध करुन घेण्याचे आहे. (७) महारेल / ठेकेदार यांना काम करीत असताना स्थानिक पोलीसांची (भिलवडी पोलीस ठाणे) बंदोबस्त कामी गरज भासल्यास आवश्यकतेनुसार त्यांनी योग्य तो शासकीय मेहनताना भरून पोलीस अधिक्षक सांगली यांच्या कार्यालयाकडून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्याचे आहे.
या अटी व शर्तीची अंमलबजावणी होण्याबाबत कार्यकारी अभियंता मध्य रेल्वे, मिरज, पोलीस अधिक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज यांनी दक्षता घ्यावी. महाराष्ट्र रेल इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांनी भिलवडी नांद्रे स्थानकांदरम्यान किर्लोस्करवाडी रेल्वे फाटक क्र. 119 कि.मी. 256/6-7 येथे वसगडे गाव ते निमणी गांव दरम्यानचा राज्य महामार्ग 142 वरून होणारी वाहतूक प्रतिबंधित करण्यात आल्याबाबतची माहिती जनतेला कळविण्यासाठी ग्रामीण व शहरातील महत्वाच्या सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी अधिसूचनेस तसेच वाहतुकीसाठी उपलब्ध पर्यायी मार्गाच्या माहितीस व्यापक प्रमाणात प्रसिध्दी द्यावी. या निर्णयाची तात्काळ प्रभावीपणे व संपूर्णतः अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
➡️ https://youtube.com/@thejanshakatinews5707
➡️ https://www.theJanShaktiNews.in
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰