BANNER

The Janshakti News

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ---- राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे --- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी ; राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक संपन्न..





    सांगली, दि. 16 (माध्यम कक्ष) : मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून, सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच, जिल्ह्यात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुलभतेने व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.


            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, पोलीस उपअधीक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते व प्रतिनिधी उपस्थित होते.



            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निवडणूक वेळापत्रक, आदर्श आचारसंहिता, निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण, गुन्हे प्रकटीकरण, आवश्यक परवानग्या, सी - व्हिजील, केवायसी, सुविधा पोर्टल आदि संगणकीय व्यवस्था, उपयोजके (एप्लिकेशन्स), महिला, दिव्यांग, युवा संचलित, संकल्पना आधारित विशेष मतदान केंद्रे, आदर्श मतदान केंद्रे आदिबाबत माहिती दिली.

            निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आचारसंहिता, एम.सी.सी., कायदा व सुव्यवस्था याबाबत सविस्तर माहिती बैठकीत दिली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

        यावेळी उपस्थित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना नॉमिनेशन फॉर्म भरण्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. उमेदवारांच्या खर्चाबाबत ठेवण्यात येणाऱ्या नोंदवह्या, खर्चाचा तपशील, दर, याबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी एमसीएमसी समितीच्या कामकाजाबाबत माहिती दिली. तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आदी माध्यमातून उमेदवारांच्या जाहिराती प्रसारीत करण्यापूवी एमसीएमसी समितीकडून पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰