राज्यातील 120 आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारतींचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न
नंदुरबार, दि. ९ : गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आदिवासी बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात ३ हजार ७५० कोटींच्या आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारती बांधून आदिवासी विद्यार्थ्यांना या इमारतींमधून गुणवत्तापुर्ण आणि सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचे काम आदिवासी विकास विभागाने केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी केले. आज नंदुरबारमधून राज्यातील १२० आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारतींचे लोकार्पण, भूमीपूजन आणि पायाभरणी कार्यक्रमात श्री. गावित बोलत होते.
शहरातील पटेलवाडी स्थित असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहाच्या प्राणंगणातून आदिवासी विकासमंत्री यांच्या हस्ते राज्यातील २ हजार ३०० कोटी रुपये किमतीच्या १२० इमारतींचे दृरदृश्य प्रणालीद्वारे राज्यभरात भुमीपुजन, पायाभरणी आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, दृकश्राव्य प्रणाली द्वारे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त नयना गुंडे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांसह राज्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, धुळ्याचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, आदिवासी बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विजय पाटील, कार्यकारी अभियंता निरज चौरे आदिंसह विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि वसतीगृहांचे विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विकास विभागाचा मंत्री झाल्यानंतर शिक्षण विभागात कशी सुधारणा करता येईल यासाठी योजनांचे काही नियोजनबद्ध आराखडे तयार करुन त्याच्या पुर्णत्वासाठी काम केले. आदिवासी बांधवांना जोपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत नाही, त्याबद्दल जागृती होत नाही, आलेल्या संधीचा उपयोग आदिवासी बांधवाना घेत नाही तोपर्यंत आदिवासी विकास विभागाचा विकास होवू शकत नाही, त्यामुळेच शिक्षणाची अद्यायवत दालने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभी केली. यापूर्वी आदिवासी विकास विभागाचा मंत्री असताना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, निवासाची सोयी उपलब्ध करुन दिल्या तर आज सर्व इमारतींमध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम केले. आज राज्यातील आदिवासी विकास विभागाची ज्या ठिकाणी स्वमालमीची जागा उपलब्ध आहे त्या प्रत्येक ठिकाणी इमारतींना निधी उपलब्ध करुन दिले आहेत. आज राज्यात एकाच वेळी 2 हजार 300 कोटी रुपयांच्या 120 इमारतींचे भुमीपुजन आणि उद्घाटन आपण केले आहे. यातील 46 इमारती या एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. तर या 46 पैकी 30 इमारती ह्या अतिदुर्गम अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील असल्याने शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पुरवण्याचा आमचा ध्यास असल्याचे यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित म्हणाले.
महाराष्ट्राचा आदिवासी विकास विभाग निर्माण झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात इमारतींवर पहिल्यांदा खर्च करण्यात येत आहे. या जिल्ह्यामधील विभागाच्या 90 टक्के इमारती बांधकामासाठी घेतल्या असून दहा टक्के राहीलेल्या इमारतीमध्ये या पुढच्या काळामध्ये आम्ही आश्रम शाळांमध्ये सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. पुढील दोन वर्षांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे आश्रमशाळा आहे तिथे सर्व कर्मचारी, शिक्षकांची निवासस्थाने त्या ठिकाणी बांधून पुर्ण होतील, त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्या ठिकाणी चांगल्या रितीने फायदा होऊ शकेल. या सोबत विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण पाहता विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी काही संस्थासोबत करार देखील केला असल्याचे यावेळी मंत्री श्री. गावित यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर येण्यास विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. विभागाच्या आश्रमशाळांमध्ये डिजीटल लायब्ररीची सोय उपलब्ध करुन दिली जाणार असून यातून विद्यार्थ्याचे ज्ञान वृद्धींगत होण्यासोबतच त्याच्या शंकेचे निरसरण देखील होणार आहे. राज्य शासनाने मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. मात्र आदिवासी विद्यार्थीनी ह्या खऱ्या अर्थाने भाग्यवान असून त्यांना याआधीच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच विभागाच्या वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वयंम् योजनेतून देखील आर्थिक मदत देण्याचे काम विभागाकडून केल्या जात आहे. विभागाने काही विषय तज्ञ शिक्षकांची विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी निवड देखेली केली आहे. सुट्टीच्या दिवशी हे विषय तज्ञ ऑनलाईन पद्धतीन आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्याचे काम करणार असल्याचे देखील यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी सांगितले. पाचवीपासूनच काही गुणवंत विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत स्पर्धा परिक्षांसाठी तयार केले जाणार असून याचा फायदा त्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये होणार असल्याचे देखील यावेळी ते म्हणाले.
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रातील अभिरुची पाहता आदिवासी विकास विभागातील प्रत्येक अप्पर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात एक स्वंतंत्र खेळाडूंची आश्रमशाळा तयार करुन याठिकाणी आदिवासी खेळाडू विद्यार्थ्यांना त्याच्या अभिरुचीच्या खेळात प्रशिक्षित करण्याचा निर्णय देखील विभागाने घेतला असल्याचे यावेळी मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले. यासोबत 1 हजार 497 क्रिडा, कला, संगणक शिक्षकांच्या भरतीसही मान्यता देण्यात आली असून एक दोन दिवसात त्यांच्या भरतीची जाहिरात निघणार असल्याचे सांगत विभागात मागच्या काळातील 835 क्रीडा शिक्षकांना मान्यता देण्याचे निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी वित्तीय महामंडळाला यंदा आदिवासी विकास विभागाने 50 कोटीं दिले असून यातून आदिवासी बांधवांना उद्योग धंदे, विविध व्यवसाय सुरु करण्यास चालना मिळणार आहे. पेसा उपयोजना क्षेत्राची 40 वर्षानंतर पुर्नरचना करुन राज्य सरकारने त्याला मान्यता देत राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठविल्याचे देखील मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले
जिल्ह्यातील 16 सोंगाड्या पार्टीना प्रोत्साहण देण्यासाठी त्यांना साहीत्य खरेदी करण्यासाठी मदतनिधी दिला आहे. सोंगाड्याच्या माध्यमातून संस्कृती टिकण्यासोबत समाज प्रबोधनाचे काम देखील होणार असल्याचे मंत्री डॉ. गावित यावेळी म्हणाले.
यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. गावित यांनी विद्यार्थ्यांना विभागाच्या विविध योजनेच्या माध्यमातून गुणवत्ता पुर्ण शिक्षण घेवून जिल्ह्याचे आणि समाजाचे नावे उंचावण्यासाठी ध्येय बाळगण्याचे आवाहन केले. आदिवासी विकास विभागामार्फत पहिल्यांदाच अशा पद्धतीने दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात भुमीपुजन आणि लोकार्पण सोहळा होत असल्याने आदिवासी विकास विभाग विकासाची कास धरत असल्याचे हे उदाहरण असल्याचे डॉ. गावित म्हणाल्या.
यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रस्तावना करतांना विभागाचे सचिव यांनी विभागाच्या विविध योजनांसोबत विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण आणि आहार देण्यासाठी आदिवासी विकास विभाग विविध योजना राबवत आहे, यासाठी अधिकारी, कर्मचारी चांगले काम करत असल्याचे यावेळी सचिव विजय वाघमारे म्हणाले. बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या चांगल्या समन्वयाने बांधल्या गेलेल्या इमारती या उत्कृष्टतेचे उदाहरण असून राज्यातील आश्रमशाळांमध्ये ७२ नमो केंद्र देखील उभारले जात असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पायाभरणीसाठी असे निर्णय महत्वाचे असल्याचे देखील यावेळी बोलतांना सचिव विजय वाघमारे म्हणाले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
➡️ https://youtube.com/@thejanshakatinews5707
➡️ https://www.theJanShaktiNews.in
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰