BANNER

The Janshakti News

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची जत तालुक्यास भेट नामनिर्देशनपत्र प्रक्रियेच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा




 

          सांगली दि. 21 (माध्यम कक्ष) : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज जत, मिरज तालुक्यास भेट देऊन निवडणूकविषयक व नामनिर्देशनपत्र प्रक्रियेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा घेतला.




           जत येथील भेटीत जत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसिलदार प्रविण धानोरकर आदि उपस्थित होते.

           जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जत तालुक्यातील तिकोंडी, उमदी, चडचण, को.बोबलाद सह जत येथील मतमोजणी केंद्र येथे प्रत्यक्ष भेट देवून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्था, मतदान केद्रावरील सोयी सुविधा, मतदान केंद्रांवर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, सावली, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदि सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिले. त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृती कार्यक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याबरोबरच मतदार स्लीपचे 100 टक्के वाटप करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी देण्यात येणाऱ्या घरबसल्या मतदान                  सुविधेबाबतचाही आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणूक प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


         सांगली विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँगरूमलाही जिल्हाधिकारी यांनी भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच मिरज येथील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय येथेही त्यांनी भेट देवून पहाणी केली. या  एकाच  ठिकाणी आठ मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

           पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. सीमा भागातील चेक पोस्टवर सतर्क राहून तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰