BANNER

The Janshakti News

बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करा.. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांची मागणी...






सांगली : आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी कायम लढा देणारी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या वतीने   सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणीच्या नावाखाली रक्त तस्करी केली जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. निवेदनानुसार बांधकाम कामगारांच्या रक्त तपासणीसाठी 'हिंद लॅब' कर्मचारी रात्री अपरात्री बांधकाम कामगारांच्या घरी जाऊन जोर जबरदस्तीने त्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे रक्त घेतात. कामगारांची रक्त तपासणी करण्याची गरज नसल्याचे सांगितले तरी देखील हिंद लॅब कर्मचारी त्यांच्यावर दबाव आणून रक्त घेतात. याशिवाय नियमाप्रमाणे डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असताना हे डॉक्टर त्यावेळी उपस्थित नसतात, कोणत्याही वैद्यकीय सेवा उपलब्ध नसताना जागेवर  रक्त घेतले जात आहे. बरेचदा बांधकाम कामगार चक्कर येऊन खाली कोसळलेल्या घटना घडल्या आहेत याचबरोबर इतर व्याधी त्रास सुरू झालेला आहे. तपासणीचे बोगस डॉक्टरांनी चुकीचे रिपोर्ट तयार केले असून,  वैद्यकीय दृष्टिकोनातून तपशील न करताच आजार दाखवले जात आहेत. बांधकाम कामगार यांच्या रक्ताची विनाकारण तपासणी करून मंडळाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा घाट सुरु आहे. कामगार आजारी नसताना व अवश्यकता नसतानाही केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. 'हिंद लॅब' या संस्थेला राजकीय हस्तक्षेप आर्थिक तडजोड करून सदर टेंडर देण्यात आले असून प्रत्येक कामगारा पाठीमागे हजारो रुपये मंडळाकडून उकळले जात आहेत. बांधकाम कामगारांना तासंतास वेटीस ठेवून कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना अथवा संमती न घेता जबरदस्तीने तपासणी करण्याचा घाट व तपासणी न केल्यास कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही अशी ताकीद लॅब कडून देण्यात येत आहे. येथे होत असणाऱ्या तपासण्या शंकास्पद आहेत. अनेक कामगारांच्या तपासण्या होऊनही त्यांना वर्षभर रिपोर्ट दिले जात नाही व पुन्हा तपासणीचा घाट केला जातो. तपासणी करत असताना कोणत्याही प्रकारच्या चहाअथवा पाण्याची व्यवस्था केली जात नाही. सदर तपासणीच्या रिपोर्टवर डॉक्टरांची ओरिजनल सही केली जात नाही. कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षित कर्मचारी अथवा डॉक्टर जागेवर उपलब्ध नसतात. सदर तपासणीसाठी घेतलेल्या रक्ताची तस्करी होते की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. या बोगस तपासण्या तात्काळ बंद करून सदर डॉक्टर व लॅब यांची चौकशी व्हावी व सदरच्या योजनेसाठी खर्ची करण्यात आलेला पैसा वसूल करण्यात यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्यावतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.


 यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हा संपर्कप्रमुख संजय भुपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे महासचिव अनिल मोरे सर, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, कोषाध्यक्ष हिरामण भगत, महापालिका क्षेत्राध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहराध्यक्ष संगप्पा शिंदे, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार, राजु मुजावर, जावेद आलासे, परशुराम बनसोडे, संदिप कांबळे, सुभाष पाटील, जयकर काळे यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰