क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड साखर कारखान्याचा 'बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ' संपन्न
कुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सह. साखर कारखान्याचा सन २०२४-२५ गळीत हंगाम 'बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ' कारखान्याचे संस्थापक संचालक आ. अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यमान अध्यक्ष शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कारखान्याचे संचालक सौ व श्री. संग्राम खनाजीराव जाधव या उभयतांच्या शुभहस्ते पार पडला.
खरंतर यावर्षीची ऊसक्षेत्र नोंदणी १५ टक्क्यांपर्यंत कमी असताना यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्यामुळे आडसाली ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात शेतकरी चर्चासत्रातून योग्य त्या उपाययोजना सुचविण्याचे काम ऊस विकास विभागाच्यावतीने सुरू आहे. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांती कारखाना १३ लाख मेट्रिक टन इतके उच्चांगी ऊस गाळप करून जिल्ह्यात प्रथमस्थानी राहिल, अशी खात्री आहे.
ज्या शेतकऱ्यांनी चालू हंगामासाठी ऊस नोंदणी केली आहे, अशांनी आपला संपूर्ण ऊस तोडणी प्रोग्रॅमनुसार कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहन शरद लाड यांनी केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, आजपर्यंत कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस व ऊस उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आपण काम करत आलो आहोत. तंत्रज्ञानाची जोड असल्याशिवाय कृषिक्षेत्रात वाढ होणे अशक्य आहे, ही बाब लक्षात घेऊन आपल्या कारखान्याच्या माध्यमातून ऊस शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग आपण नेहमीच राबवत असतो. त्याचपद्धतीने कर्मचारी वर्गासाठी ‘एम्प्लॉइ अटेंडन्स ऑनलाइन रीपोर्टिंग’ नावाचे एक मोबाईल अप्लिकेशन आपण सुरू करतोय. ज्यामुळे कामगारांची हजेरी तसेच रजा व इतर बाबींमध्ये अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. त्याच पद्धतीने कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य विमा सुरू करण्याच्यादृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत.
सदर कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हा. चेअरमन, आजी-माजी संचालक, सभासद, कार्यकारी संचालक, सेक्रेटरी, इतर अधिकारी, कर्मचारी व पलुस-कडेगाव तालुक्यातील हितचिंतक तसेच कार्यकर्ता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰