कुंडल दि. 29 : आ. अरुण लाड यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त 'क्रांतिअग्रणी पर्व' या पाक्षिकचा पहिला अंक दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांच्याहस्ते प्रकाशित करण्यात आला.
क्रांतिअग्रणी स्व. डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या विचारातून २००८ साली निर्माण झालेले 'क्रांतिअग्रणी पर्व' हे पाक्षिक २०२० साली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आले होते. हे पाक्षिक पुन्हा नव्या जोमाने सुरू करून प्रबोधन, संघटन आणि संघर्षासाठीचा हा प्रवास सुरु ठेवण्यात यावा, असे मत आ. अरुण लाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांजवळ अनेकदा व्यक्त केले होते. आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त समाजप्रबोधनाचे माध्यम असणारे हे पाक्षिक सुरु करण्याचा निश्चय संबंधित कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला होता, जो आज पूर्ण झाला, अशी माहिती पाक्षिकचे मालक अशोक पवार यांनी दिली.
प्रतिसरकारच्या या राजधानीत नेहमीच असे क्रांतिकारी उपक्रम पाहायला मिळतात. तळहातावर शीर घेऊन सामान्य जनतेसाठी, देशासाठी लढणारी ही अघोरी मंडळी स्वातंत्रोत्तर काळात सुद्धा प्रबोधन करताना दिसली व त्यांचे नेतृत्व नेहमीच जी. डी. बापूंनी केले. हाच वारसा पुढे अविरतपणे आ. अरुण लाड यांनी चालवला आहे. हे पाक्षिक आणि पुरोगामी क्रांतीविचार आ. अरुण लाड व शरद लाड यांच्या माध्यमातून पुढेही चालत राहतील, याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन वसंत भोसले यांनी यावेळी केले.
सदर प्रकाशन सोहळ्यासाठी क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड, सांगली जिल्ह्यातील पत्रकार, साहित्यिक, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰