yuva MAharashtra विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


 

सांगली, दि. 15 (जि. मा. का. वृत्तसेवा) : मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम आज दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया जिल्ह्यात शांततेत, निःपक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यास व आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

निवडणूक कार्यक्रमानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. (१) अधिसूचना प्रसिध्दी - मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024, (२) नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख - मंगळवार दि. 29 ऑक्टोबर 2024, (३) नामनिर्देशन पत्राची छाननी - बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024, (४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख - सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024, (५) मतदानाची तारीख – बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024, (६) मतमोजणीची तारीख - शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024, (७) निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख - सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024.

सांगली जिल्ह्यात 281-मिरज (अनुसूचित जाती), 282-सांगली, 283-इस्लामपूर, 284-शिराळा 285-पलूस-कडेगाव, 286-खानापूर, 287-तासगाव-कवठेमहांकाळ व 288-जत असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. सांगली जिल्ह्यात एकूण 25 लाख 22 हजार 509 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 76 हजार 791, स्त्री मतदार 12 लाख 45 हजार 570, तृतीयपंथी 148 मतदार आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 2482 मतदान केंद्रे आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, निवडणूक प्रक्रियेची आणि आदर्श आचारसंहितेची सविस्तर माहिती राजकीय पक्ष तसेच अधिकाऱ्यांनी घ्यावी. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यादृष्टीने सर्वांनी दक्षता घेवून निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातींचे माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणिकरण करून घेणे बंधनकारक आहे. उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, पक्ष व त्रयस्थ यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सांगली जिल्ह्यासाठी मुक्त व पारदर्शी निवडणुका पार पाडण्याकरिता आवश्यक असणारे मनुष्यबळ व पुरेसा बंदोबस्त उपलब्ध आहे. जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहितेचे सर्वांनीच काटेकोरपणे पालन करून निवडणूक मुक्त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडायची आहे. आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हास्तरावर पुरेशा प्रमाणात पथकांची नियुक्ती आली आहे. सी व्हिजील ॲपवरून आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करता येऊ शकेल, असे ते म्हणाले.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰