yuva MAharashtra नूतन अद्ययावत अभ्यासिकेमुळे पेडच्या सौंदर्यात भर - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

नूतन अद्ययावत अभ्यासिकेमुळे पेडच्या सौंदर्यात भर - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे


 

सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : पेड येथे नाविन्यपूर्ण योजनेतून 40 लाख रूपये खर्चून नूतन सुसज्ज अशी अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. या अभ्यासिकेमुळे पेड गावच्या सौंदर्यात भर पडेल, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.  




तासगाव तालुक्यातील पेड येथे नूतन अभ्यासिका इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी के. टी. माने, सरपंच पल्लवी चव्हाण, तासगाव पंचायत समिती उपअभियंता विश्वास नाईक, शाखा अभियंता श्री. निपाणीकर, जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, पंचायत समिती माजी उपसभापती प्रभाकर पाटील, राजाराम गरूड, दिलीप शेंडगे, जितेंद्र शेंडगे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतचे आजी व  माजी पदाधिकारी उपस्थित होते.



पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, पेड येथे ज्या शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झाले, ती शाळा मोडकळीस आली होती. त्या शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. ही अभ्यासिका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना उपयुक्त ठरणार असून यामुळे या गावातून चांगले अधिकारी निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.  पेड गावच्या विकासासाठी आत्तापर्यंत भरीव निधी दिला असून अद्यापही काही अडचणी असतील तर त्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.





यावेळी प्रमोद शेंडगे, दिलीप शेंडगे, जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, पंचायत समिती माजी उपसभापती प्रभाकर पाटील, प्राचार्य पी. बी. स्वामी, दिलीप शेंडगे, जितेंद्र शेंडगे आदींनी मनोगत व्यक्त करताना या अभ्यासिकेमुळे वाचन संस्कृती रूजण्यास मदत होऊन गावातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होईल असे मत व्यक्त केले.



या कार्यक्रमास पेड पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰