सांगली, दि. 15 (जि. मा. का. वृत्तसेवा) : मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया शांततेत, निःपक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणुकीच्या विविध कामांसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन सज्जतेचा आढावा घेण्यासाठी आयोजित नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, विधानसभेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांची सखोल माहिती घ्यावी. त्याप्रमाणे नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करून निवडणूक काळात सर्व यंत्रणांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे, असे ते म्हणाले.
या बैठकीत मनुष्यबळ व्यवस्थापन, जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा, मतदान केंद्रातील व्यवस्थापन, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, साधनसामग्री व्यवस्थापन, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था, निवडणूक दरम्यान वाहतूक व्यवस्था, निवडणूक प्रशिक्षण, मीडिया प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, हेल्पलाईन व तक्रारींचे निरसन या विषयांबाबत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने प्रशासन सज्जतेचा आढावा घेण्यात आला.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰