सांगली, दि. 5 (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात शांततेत, तसेच मुक्त आणि पारदर्शी वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी मा. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून दिलेली जबाबदारी पार पाडावी. मतदान टक्केवारी वाढीसाठी मतदार जनजागृतीसह मतदान केंद्रांवर आश्वासित किमान सुविधा (ॲशुअर्ड मिनीमम फॅसिलिटीज) पुरवाव्यात, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाज आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, असे निर्देश देऊन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत. शालेय स्पर्धांचे आयोजन करावे. विद्यार्थ्यांसाठी अन्य स्पर्धांसह सेल्फी स्पर्धा घ्याव्यात. पोस्टल बॅलेटचे योग्य नियोजन करावे. मतदान केंद्रावर मतदारांच्या मदतीसाठी आयोगाच्या सूचना पाहून आवश्यकतेनुसार 18 वर्षांखालील युवकांची मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
मतदान केंद्रांवरील वेबकास्टिंग सुरळीतपणे सुरु राहील याची दक्षता घ्यावी. सीव्हीजलवर येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद द्यावा. त्या प्राधान्याने निकाली काढाव्यात. सर्व यंत्रणांनी दिलेली जबाबदारी सतर्कतेने चोख पार पाडावी, असे सांगून पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग मतदारांसह अन्य मतदारांसाठी मा. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आश्वासित किमान सुविधा पुरवाव्यात. दिव्यांगासाठी रॅम्प, व्हीलचेअरची सुविधा, पिण्याचे पाणी, निवारा शेड, स्वच्छ स्वच्छतागृहे, खुर्च्या, आदि सर्व सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सादरीकरणातून निवडणूक पूर्वतयारी व निवडणूक प्रशासन सज्जतेची माहिती दिली. तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सादरीकरणातून माहिती दिली.
विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांचे स्वागत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. तर आभार प्रदर्शन नीता शिंदे यांनी मानले.
आचारसंहिता कक्ष, तक्रार निवारण कक्ष, माध्यम कक्षास भेट
बैठकीपूर्वी विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी आचारसंहिता कक्ष, तक्रार निवारण कक्ष आणि माध्यम कक्षास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, तक्रार निवारण कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे आणि माध्यम कक्षाच्या नोडल अधिकारी संप्रदा बीडकर यांनी संबंधित कक्षातून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰