सांगली, दि. 5 (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत विविध उपक्रमांद्वारे मतदार जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. ज्या बुथवर मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील सरासरी मतदान टक्केवारीपेक्षा कमी मतदान झाले आहे, त्या बुथवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करून मतदार जनजागृतीसाठीचे कार्यक्रम घ्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वीप उपक्रम आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून दूरदृष्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह स्वीपचे तालुका नोडल अधिकारी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ज्या बुथवर मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सरासरी पेक्षा कमी मतदान झाले आहे, अशा मतदान केंद्रांवर मतदार जनजागृतीसाठी विविध घटकांचा सहभाग घ्यावा. त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघ स्तरावर आठवड्यातून किमान एक याप्रमाणे दोन मोठे कार्यक्रम घ्यावेत. या कार्यक्रमांमध्ये मतदारांचा सहभाग घ्यावा. शाळेतील मुलांमार्फत त्यांच्या पालकांकडून मतदानाबाबत संकल्प पत्र भरून घ्यावे. मतदार जनजागृतीव्दारे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हास्तरावरील आयकॉन यांचा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक मोठा कार्यक्रम घ्यावा. विधानसभा मतदारसंघ स्तरावर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सहभाग घ्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदारसंघनिहाय स्वीप कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा तसेच यापुढे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबतचा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण विभाग, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, महानगरपालिका आदि यंत्रणांमार्फत मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबतची माहिती देण्यात आली.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰