सांगली, दि. 22 (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार असून, मतमोजणीसाठी सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी विविध मतमोजणी केंद्रांना भेट देऊन तेथील सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक अशी आठ मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. आठही विधानसभा मतदार संघांसाठी आठ मतमोजणी निरीक्षक नेमले गेले आहेत. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होईल. तत्पूर्वी निरीक्षक व उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समोर सीलबंद स्ट्राँग रूम्स उघडण्यात येतील व ईव्हीएम मशिन्स टेबलवर नेण्यात येतील. पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी 8.30 वाजता समांतर पद्धतीने सुरू राहील. मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सी.सी. टीव्हीद्वारे चित्रित केली जाईल. तीन-स्तरीय सुरक्षा व्यवस्था निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात आली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केंद्र पुढीलप्रमाणे –
281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ – शासकीय धान्य गोदाम, वैरण बाजार, मिरज
282-सांगली विधानसभा मतदारसंघ – तरूण भारत स्टेडिअम, सांगली
283-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ – शासकीय धान्य गोदाम, इस्लामपूर
284-शिराळा विधानसभा मतदारसंघ – श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा
285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ – औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कडेगाव कराड रोड, कडेगाव
286-खानापूर विधानसभा मतदारसंघ – इनडोअर स्पोर्टस् फॅसिलिटी सेंटर, बळवंत कॉलेज, विटा
287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ – शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तासगाव
288-जत विधानसभा मतदारसंघ – जुने शासकीय धान्य गोदाम क्र. 2 तहसिल कार्यालय, जत
विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त मनुष्यबळ 20 टक्के राखीवसह, मतमोजणीच्या फेऱ्या, टपाली मतपत्रिका मतमोजणीसाठी टेबल्स, इटीपीबीएस (ETPBS) टेबल्स यांची संख्या पुढीलप्रमाणे -
281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात नियुक्त मनुष्यबळ 144, मतमोजणीच्या फेऱ्या 16, ईव्हीएम मतमोजणीसाठी 20 टेबल्स, टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी 8 टेबल्स, इटीपीबीएस (ETPBS) साठी 4 टेबल्स.
282-सांगली विधानसभा मतदारसंघात नियुक्त मनुष्यबळ 137, मतमोजणीच्या फेऱ्या 16, ईव्हीएम मतमोजणीसाठी 20 टेबल्स, टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी 8 टेबल्स, इटीपीबीएस (ETPBS) साठी 1 टेबल.
283-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात नियुक्त मनुष्यबळ 96, मतमोजणीच्या फेऱ्या 21, ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल्स, टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी 4 टेबल्स, इटीपीबीएस (ETPBS) साठी 4 टेबल्स.
284-शिराळा विधानसभा मतदारसंघात नियुक्त मनुष्यबळ 154, मतमोजणीच्या फेऱ्या 17 , ईव्हीएम मतमोजणीसाठी 20 टेबल्स, टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी 10 टेबल्स, इटीपीबीएस (ETPBS) साठी 4 टेबल्स.
285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात नियुक्त मनुष्यबळ 106, मतमोजणीच्या फेऱ्या 21, ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल्स, टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी 6 टेबल्स, इटीपीबीएस (ETPBS) साठी 4 टेबल्स.
286-खानापूर विधानसभा मतदारसंघात नियुक्त मनुष्यबळ 134, मतमोजणीच्या फेऱ्या 18 , ईव्हीएम मतमोजणीसाठी 20 टेबल्स, टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी 6 टेबल्स, इटीपीबीएस (ETPBS) साठी 4 टेबल्स.
287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात नियुक्त मनुष्यबळ 130, मतमोजणीच्या फेऱ्या 22, ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल्स, टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी 11 टेबल्स, इटीपीबीएस (ETPBS) साठी 4 टेबल्स.
288-जत विधानसभा मतदारसंघात नियुक्त मनुष्यबळ 106, मतमोजणीच्या फेऱ्या 21, ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल्स, टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी 6 टेबल्स, इटीपीबीएस (ETPBS) साठी 4 टेबल्स.
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मा. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलसाठी एक पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक व एक सूक्ष्म निरीक्षक, तसेच टपाली मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलसाठी एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक व एक शिपाई यांची तर इटीपीबीएस साठी प्रत्येक टेबलसाठी एक पर्यवेक्षक, एक सहायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्रावर नियुक्त मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी मदत कक्ष, सार्वजनिक संप्रेषण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी विविध कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षाच्या ठिकाणी तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष तयार करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रावर नियमित, सुरळीत विद्युत पुरवठा राहावा यासाठी आवश्यकता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतमोजणी प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰