yuva MAharashtra विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी

   

     सांगलीदि. 6 (माध्यम कक्ष) :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, याकरिता उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी उद्योगऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जाहिर करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे. पोटकलम (1) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.

उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित परिपत्रकात नमूद केले आहे.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰