भिलवडी दि. ४ : ज्येष्ठ नेते मोहनराव कदम तसेच आमदार डॉ.विश्वजीत कदम हे सामान्य माणूस डोळ्यांसमोर ठेवतात. याच कारणामुळे ते सर्वसामान्य माणसांसाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि पलूस तालुका काँग्रेसचे नेते महेंद्र लाड यांनी केले.
भिलवडी ता.पलूस येथील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
प्रमुख नेते आणि सांगली कारखान्याचे संचालक राजूदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक मताधिक्य देण्याचा चंग बांधण्यात आला.
महेंद्र लाड म्हणाले, स्व.डॉ.पतंगराव कदम किंवा आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी हजारो तरूणांना भारती विद्यापीठात नोकरी उपलब्ध करून दिली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ते राज्यात अग्रेसर आहेत. डॉ. विश्वजीत कदम हे उमदं नेतृत्व आहे. साहेबांच्या पश्चात त्यांनी पलूस -कडेगाव मतदारसंघ अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे. ३०० एकर जमीन डॉ.पतंगराव कदम सोनहिरा कारखान्याच्या माध्यमातून क्षारपडमुक्त केली. सुमारे १ कोटीची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली. आपल्याकडे येणाऱ्याचे फक्त काम झाले पाहिजे हेच आमदार साहेबांच्या डोक्यात असते. त्यांनी कधीही पक्षपातीपणा केला नाही.
ते म्हणाले, स्व.डॉ.पतंगराव कदम साहेबांची शिकवण आहे की, सर्वसामान्य लोकांची कामे झाली पाहिजेत. तोच वसा आणि वारसा आ.डॉ.विश्वजीत कदम चालवत आहेत. त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठाम राहणे, पाठिंबा देणे गरजेचे आहे.
माजी सरपंच सपना चौगुले यांनी तुमचे दीड हजार नको तर बहिणीला दीड लाखांचे काम द्या असे सांगितले. नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष आर.के. रोकडे यांनी हाकेला ओ देणारे आ.डॉ.विश्वजीत कदम आहेत. त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्य देण्याचे आवाहन केले. माजी सरपंच राहुल कांबळे, ऐनुद्दिन जमादार, बाळासाहेब मोरे, अमोल चौगुले, सचिन पाटील, धनंजय पाटील, भू.ना.मगदूम, शशिकांत उंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच सीमा शेटे यांनी आमच्या भावाला आम्ही सर्व बहिणी मताच्या रूपाने मोठं गिफ्ट मिळवून देवू अशी खात्री दिली.
हनुमान मंदिरापासून रॅली काढून येथील काँग्रेसच्या कार्यालयात लोकनेते स्व.बाळासाहेब काका पाटील, स्व. संग्राम दादा पाटील, स्व. आनंदराव भाऊ मोहिते यांना अभिवादन करण्यात आले.
सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले. स्वागत बी.डी.पाटील तर आभार शहाजी गुरव यांनी मानले.
युवा नेते पृथ्वीराज पाटील, प्रतिक संग्राम पाटील, विजय चोपडे, बाळासाहेब मोहिते, मोहन तावदर, सतीश पाटील, मुसा शेख यांच्यासह सर्व नेतेमंडळी व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰