सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सवामध्ये महाराष्ट्र राज्याचा संघ पाठविण्यात येणार असून यासाठी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर या क्रमाने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने सांगली जिल्हास्तरीय महोत्सव येत्या दिनांक 5 डिसेंबर रोजी बालगंधर्व नाट्यगृह मिरज या ठिकाणी होणार आहे. या युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हास्तरीय व विभागस्तरीय युवा महोत्सव सन 2024-25 नियोजन बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस क्रीडा व युवक सेवा संचलनालय कोल्हापूर विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्यासह समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. एस. ए. परदेशी, राजेंद्र पोळ, वंदना हुळबत्ते, प्राचार्य डॉ. एस. एन. खिलारे, सागर व्हनमाने, एम. डी. वडमारे, डॉ. पी. एन. चौगुले आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी दरवर्षी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाव्दारे राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. युवा महोत्सवामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये नवसंकल्पना Innovation in Science and Technology या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार युवकांनी आपले MODELS/ उपकरणे तयार करून महोत्सवामध्ये त्यांचे प्रदर्शन करावे. क्रीडा कार्यालयाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करून युवा महोत्सव यशस्वी करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
युवा महोत्सवाबाबत माहिती देताना जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या युवकांसाठी वयोमर्यादा 15 ते 29 वर्षे अशी असणार असून वयोमर्यादेसाठी 15 जानेवारी 2025 रोजी 15 ते 29 वर्षे असणारा युवक व युवती यामध्ये सहभागी होऊ शकतील. प्रथम तीन क्रमांकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच लोकगीत, लोकनृत्य, कथालेखन, कविता लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा (हिंदी किंवा इंग्रजी) आदि बाबींचा समावेश असून याही बाबींसाठी रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. याबरोबरच युथ आयकॉन या विषयांमधून युवकांसाठी कल्याणकारी योजना व कृती करणाऱ्या आदर्श युवकांची युथ आयकॉन म्हणून निवड करण्यात येणार आहे.
महोत्सवामध्ये / स्पर्धेमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यकीय महाविद्यालय, आय.टी.आय अशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच विविध युवा मंच मंडळे यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. सहभागी होणाऱ्या युवकांना अल्पोपहार व भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली कार्यालयाचे क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे (भ्रमणध्वनी क्रमांक ९६७३४५१११५) या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰