सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी विकास साधावा. शेतीपूरक व्यवसायातून आणि राष्ट्रीय पशुधन अभियानाचा उपयोग करून उद्योजक तयार व्हावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे आधार हॅचरीजच्या नवीन हॅचिंग यूनिटचे उद्घाटन आणि राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून पोल्ट्री ब्रीड डेव्हलपमेंट प्रकल्प आधार हॅचरीजला मंजूर झाला आहे. त्याची पाहणी डॉ. राजा दयानिधी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आदित्य गुंजाटे, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त संतोष शिरमनवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अक्षता रेणुसे, मंडल अधिकारी उत्तम कांबळे, तलाठी राजू इंगळे, आधारचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, संचालक पोपट मुळीक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, आधार हॅचरीजच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायात अत्यंत चांगले, प्रेरणादायी व आदर्श काम उभे केले आहे. शेतीपूरक व्यवसायातून नवीन उद्योजक घडत आहेत. आधार चे काम त्यासाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी, असे ते म्हणाले.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे म्हणाले, राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पूर्ण झालेला महाराष्ट्रातील पहिला पोल्ट्री प्रकल्प आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधारचा आदर्श घेऊन शेळी, मेंढी, वैरण विकास प्रकल्पाचे प्रस्ताव सादर करावेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून पशुसंवर्धन विभागास प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत आहे.
आधार हॅचरीज चे संचालक गोपाळ पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आधार डेअरी चे संचालक अनिल परीट यांनी आभार मानले. आधार चे संचालक राजाराम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी केदार पवार, संजय परीट, अर्जुन क्षीरसागर, चंद्रकांत पाटील, ज्ञानदीप पाटील आदी उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰