yuva MAharashtra ‘मित्रा’ने विविध प्राधान्य क्षेत्रांत दिशादर्शक काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मित्रा’ने विविध प्राधान्य क्षेत्रांत दिशादर्शक काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबई दि. २८: देशातील अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवण्यासाठी वित्तीय सुधारणा, खनिकर्म, गटशेती, सौरऊर्जा प्रकल्प, जैव इंधन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी यासारख्या प्राधान्य क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या संस्थेने दिशादर्शक काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनची (मित्रा) बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सामूहिक विकासाला चालना देण्यात येत आहे. राज्यात साधारण 400 गट कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश गटांनी चांगली कामगिरी केली आहे. कृषी, जलसंधारण, फलोत्पादन, पणन आदी विभागांच्या योजनांचा एकत्रित लाभ देऊन गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक-सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध योजनांच्या अभिसरणाचे एक मॉडेल तयार करण्यात यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राजकोषीय तूट कमी करणे, भांडवली गुंतवणुकीवर भर देणे, मालमत्तांचे सनियंत्रण करणे, योजनांचे अभिसरण, जलसंधारणाचे अपूर्ण प्रकल्प गतीने पूर्ण करणे, राज्याची डेटा पॉलिसी, खनिकर्म पॉलिसी जाहीर करणे यासारख्या बाबींना प्राधान्य द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.



मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी जायकवाडी प्रकल्पातील सौर ऊर्जा प्रकल्प, शेतीमधील टाकाऊ बाबींपासून बायोगॅस निर्मिती, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय आदी विषयांचाही सविस्तर आढावा घेतला.

बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., कृषी व पर्यटन सचिव जयश्री भोज यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मित्रा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰