yuva MAharashtra दिव्यांग विद्यार्थ्यांचे कला गुण विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

दिव्यांग विद्यार्थ्यांचे कला गुण विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


         सांगलीदि. ३ (जि. मा. का.) : दिव्यांगासाठीचे शासनाचे धोरण सकारात्मक आणि सर्वसमावेशक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी न्यूनगंडाची कोणतीही भावना न ठेवता समाजात आत्मविश्वासाने वावरावे. त्यांची बुद्धिमत्ता व कला-गुण विकसित करण्यासाठी पालक व शाळांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे केले.



          जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चुरर्समध्ये असोसिएशन हॉल येथे घेण्यात आला. त्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामतसमाज कल्याण विभागाचे संशोधन अधिकारी मेघराज भातेसमाज कल्याण विभाग दिव्यांग कल्याण शाखेच्या सहाय्यक सल्लागार मंजिरी माने उपस्थित होत्या.




           जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, दिव्यांगांचे संरक्षण आणि सुरक्षा ही शाळा व्यवस्थापनाची वैयक्तिक व नैतिक जबाबदारी असून, त्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. त्याला प्रशासनाचे सहकार्य राहील. दिव्यांगांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कायद्याने त्यांना दिलेले संरक्षण यांची फक्त पालक आणि शिक्षकच नव्हे तर दिव्यांग मुलांनाही जाणिव असली पाहिजे. याबाबत दिव्यांग विद्यार्थ्यांचे कायदेशीर समुपदेशन करावे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेल्या वस्तु उत्तम असून, ही कला त्यांनी जतन करावी. शाळांनीही ही कला विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून, डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल कौतुक करून, त्यासाठी मेहनत घेतलेल्या शिक्षक वृंदाचे, शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.




       मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, समाजामध्ये दिव्यांगाच्या बाबतीतील दृष्टीकोन सकारात्मक पध्दतीने व्हावा, यासाठी सर्वात जास्त कष्ट दिव्यांगासाठी असणाऱ्या संस्थांचे आहे. दिव्यांगांना घडविण्यासाठी,  ते कुठेही मागे पडू नयेत यासाठी या संस्था कष्ट करत असतात. शासन म्हणून आम्हीही कायम प्रयत्नशील असतो, असे सांगून त्यांनी पुढील शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी तसेच जागतिक दिव्यांग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

          जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे तसेच दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळांकडून राबवल्या जाणाऱ्या विशेष उपक्रमांचे प्रदर्शन देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन दिव्यांग विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले.




          स्वागत व प्रास्ताविक जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाच्या सहाय्यक सल्लागार मंजिरी माने यांनी केले. साधना मतिमंद मुलांची शाळेचे मुख्याध्यापक अनिल राजमाने यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील एकूण 36 दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळा सहभागी झाल्या. या कार्यक्रमास सुमारे दीड हजार दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰