मुंबई, दि. 6 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी खासदार सर्वश्री नरेंद्र जाधव, राहुल शेवाळे, अमर साबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी जातीयवादापासून मुक्त समाजाचे स्वप्न पाहिले होते. अज्ञान, असमानता, दारिद्र्य यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य शिक्षणात असल्याने प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, विकासाची समान संधी मिळेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा विचार देणाऱ्या बाबासाहेबांचे भव्य स्मारक दादर येथील इंदू मिल परिसरात आकाराला येत आहे. हे स्मारक देशातीलंच नव्हे, तर जगातील नागरिकांसाठी, विशेषत: युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केला.
देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सध्या भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला समता, एकता, बंधुतेचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात दिसत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबासाहेब द्रष्टे, अभ्यासू व व्यासंगी व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्यावेळी कायदा, पाटबंधारे, मजूर व वीज मंत्री म्हणून काम केले. त्यांचा कार्यकाळ हा पायाभूत सोयी-सुविधांची मुहूर्तमेढ करणारा ठरला आहे. श्री. फडणवीस म्हणाले, सध्या देशाच्या प्रमुख नीती, धोरणांमध्ये बाबासाहेबांनी तेव्हा केलेल्या भविष्यातील संकल्पनांचा अंतर्भाव दिसून येतो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ.बाबासाहेबांचे लिखाण एक प्रमाण म्हणून मानले जाते. त्यांनी तेव्हा लिहिलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात. देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडविण्याचा उपाय भारतीय संविधानामध्ये आहे. असे जगात सर्वात सुंदर असलेले संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल, असे सांगून राज्यात शासन नेहमी वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा विचार करुन संविधानाच्या अनुरूप कार्य करेल, असेही ते म्हणाले.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार सुरू आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
श्री. शिंदे म्हणाले, सत्ता हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत. त्याचा उपयोग शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील मानवी हक्कांच्या प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
- उपमुख्यमंत्री अजित पवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून शासनाचा कारभार सुरू आहे. राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी शासनाने कायम घेतली आहे. भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, यासाठी काम केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मानवतेच्या कल्याणाचा मार्ग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखविला आहे. बाबासाहेबांच्या विचारात देशाला एकता, बंधुता व समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद आहे. अशा या महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. येथे आलेला हा अथांग जनसागर त्याचेच प्रतिक आहे.
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी यावेळी मान्यवरांना संविधानाची प्रतिमा भेट दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या 'भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰