तासगांव दि. २५ : तासगाव (जि. सांगली) येथील तहसिलदार कार्यालयातील सांस्कृतिक भवनामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी दीप प्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन केले. तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी मा. प्रियांका माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. तहसिलदार अतुल पाटोळे यांनी पुष्पगुच्छ देवून प्रमुख पाहुणे मा. मिलींद सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना मा. मिलींद सुतार यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ बद्दलची माहिती तपशिलवार मांडली. ते पुढे म्हणाले की, या नव्या स्वरूपातील कायद्यामुळे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरुन फसवणुकीची किंवा सेवेतील त्रुटी बद्दलची तक्रार ग्राहक न्यायालयात आँनलाईनसुध्दा नोंद करु शकता. या तक्रारीवरील सुनावणी आभासी (व्हर्च्युअल) पध्दतीने करण्याची तसेच पुराव्याचे कागद डिजीटली सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पुर्णपणे ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करणारा हा कायदा असून यातील मुलभूत गोष्टी समजून घेवून ग्राहकांनी व्यवहार केल्यास आपल्याला कोणी फसवू शकणार नाही. यावेळी मा.आलमशहा मोमीन मा. प्रा.माणिकराव पाटील यांनीही मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषण करताना मा. तहसिलदार अतुल पाटोळे म्हणाले कि केवळ कायदा करून फसवणूक थांबणार नाही. तर लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे आणि हे काम करणारे लोक आज मला पाहण्यास मिळाले याचा मला विशेष आनंद आहे. या क्षेत्रात प्रबोधनाचे काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन मी याप्रसंगी देतो. वरिष्ठ लिपिक श्रीमती कोळेकर यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰