सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : शासनाच्या सेवा नागरिकांना अधिक सुलभ व पारदर्शी पद्धतीने देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पध्दतीने काम करावे. सुशासन सप्ताह हा आठवड्यासाठी मर्यादित न राहता वर्षभर नागरिकांच्या कल्याणासाठी अविरत सेवा द्यावी, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सुशासन सप्ताह कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी अजय पवार, नीता शिंदे आणि सविता लष्करे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, शासकीय सेवांच्या माध्यमातून प्रशासन शेवटच्या घटकापर्यंत पोहचत असते. यातून सामान्य नागरिकांचे प्रश्न, अडचणी, समस्या यांचे निराकरण होवून एक प्रकारे मोठ्या स्वरूपात जनकल्याण होत असते. याची जाणीव ठेवून शासकीय सेवेतील प्रत्येक घटकाने काम करावे. उत्तरदायी प्रशासन, तक्रारींचा जलद निपटारा, सुलभ, पारदर्शी व गतिशील व लोकाभिमुख प्रशासन या माध्यमातून प्रशासनाचे सुशासन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्या म्हणाल्या.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, शिराळा तहसिलदार शामला खोत यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰